
अहमदनगर (प्रतिनिधी)
महाविकास आघाडी सरकार म्हणजे दुसऱ्याच्या ताटात तोंड मारणारे मांजर आहे. महाराष्ट्राचे जाणते राजे म्हणून मिरवणाऱ्या नेत्यांनी राज्याचे वाटोळे केले. बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी विजयी झाल्या की हे फटाकडे फोडतात.
कृषी कायदे रद्द झाल्यावर हेच फटाके फोडून उत्सव साजरा करतात. महाविकास आघाडी सरकारचे अपयश झाकण्यासाठी हे दुसऱ्याच्या ताटात तोंड मारणारी मांजरे असल्याचेच यातून दिसून येते, अशी टीका खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली आहे.
केडगाव येथे भारतीय खाद्य निगमच्या कार्यक्रमात ते बोलत होते. आघाडी सरकारला राज्यात सुरू असलेल्या परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांचा संपाचा तिढा अद्याप सोडवता येत नाही, अशीही टीका त्यांनी केली.
पुढे ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना सुरू करून करोना काळामध्ये गरीब जनतेला धान्य पुरवठा करून कोणालाही उपाशी ठेवले नाही. मी खासदार असेपर्यंत नगर जिल्ह्यात रेशनमध्ये काळाबाजार खपून घेणार नाही. गरिबांच्या रेशनचे धान्य खाणारे व यामध्ये काळा बाजार करणाऱ्यांचे चांगले होणार नाही. त्यामुळे रेशन धान्य मध्ये कोणीही काळाबाजार करू नये.
प्रशासनाने शासनाच्या योजना खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत नक्की पोहोचवाव्यात. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री हे कर्तव्यशून्य असल्यामुळे जनतेला योजनांचा लाभ मिळत नाही, असा आरोप त्यांनी केला.
नगरसेवक मनोज कोतकर, नगरसेवक राहुल कांबळे, नगरसेवक स्वप्नील शिंदे, भारतीय खाद्य निगचे अधिकारी बी.एम.राऊत, जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी, नगरसेवक स्वप्नील शिंदे, अविनाश दाभाडे, गणेश नन्नवरे, जालिंदर कोतकर, रमाकांत गाडे, बच्चन कोतकर, नगरसेवक योगीराज गाडे, आ.बी. चिंतामणी आदी उपस्थित होते.