भाजपाच्या आमदारांनी राहुरीत एकही ट्रान्सफॉर्मर बसविला नाही

ना. तनपुरेंची वांबोरीतील आढावा बैठकीत माजी आ. कर्डिलेंवर टीका
भाजपाच्या आमदारांनी राहुरीत एकही ट्रान्सफॉर्मर बसविला नाही

उंबरे (वार्ताहर) -

वांबोरी गावाला व वाड्यावस्त्यांसाठी थेट मुळा धरणातून स्वतंत्र पाणीयोजनेसाठी जलजीवन पाणीयोजनेच्या माध्यमातून आराखडा

तयार केला आहे. त्यासाठी 28 कोटी रुपये खर्च येणार असून ते काम लवकरच मार्गी लावणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे उर्जा व नगर विकास मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले. भाजप सरकारने मागील पाच वर्षांत काय केले? याचे उत्तर द्यावे, मी महाराष्ट्राचा मंत्री आहे, त्यांच्या आमदारांनी एक ट्रान्सफार्मरही बसविला नाही, असा टोला तनपुरे यांनी माजी आमदार शिवाजी कर्डिले यांना नाव न घेता लगावला.

वांबोरी ग्रामपंचायतीत काल सकाळी ना. तनपुरे यांनी स्थानिक विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, प्रांताधिकारी जगताप, गटविकास अधिकारी गोविंद खामकर, सरपंच किरण ससाणे, उपसरपंच मंदा भिटे, संगीता जवरे, मंजुषा देवकर, माजी सरपंच नितीन बाफना, किसन जवरे, कृष्णा पटारे, ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब गागरे आदी उपस्थित होते.

नगर-वांबोरी रस्ता, स्वतंत्र पाणी योजना, सौरऊर्जा प्रकल्प, वीजप्रश्न आदींचा आढावा त्यांनी घेतला. मंत्री तनपुरे म्हणाले, नगर-वांबोरी रस्त्यासाठी मागील अर्थसंकल्पात तरतूद करून मंजुरी घेतली होती. परंतु करोनाचे संकट आल्यानंतर लॉकडाऊन झाले. त्यामुळे काही कामे थांबली आहेत. आता पुन्हा आम्ही या रस्त्याची प्रक्रिया करून सुमारे 5 कोटी 80 लाख मंजूर केले आहेत. सोमवारी या रस्त्याच्या कामासाठी टेंडर फ्लॅश होतील. ही कामे दर्जेदार होतील, तशा सूचना दिल्या आहेत. या भागातील पाच फिडर ओव्हर लोड आहेत. हा लोड आताच वाढलेला नाही, मागील पाच ते दहा वर्षांत काहीच न झाल्याने हा लोड वाढला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी उपाययोजना केल्या जातील. भाजपने मागील पाचवर्षांत काय केले? याचे उत्तर द्यावे. मी महाराष्ट्राचा मंत्री आहे. त्यांच्या आमदाराने एक ट्रान्सफार्मर बसविला नाही, असा टोलाही मंत्री तनपुरेंनी लगावला. जि. प. चे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे म्हणाले, वांबोरी ग्रामपंचायत निवडणुकीत आम्ही मतदारांना विकास कामांचे आश्वासने दिली होती. ते पूर्ण करण्यासाठी मदत करा, अशी मागणी नामदार तनपुरे यांच्याकडे त्यांनी केली.

दरम्यान सुरूवातीला कार्यक्रमात सहभागी न झालेले सरपंच किरण ससाणे बैठकीत उपस्थित झाले. त्यावेळी सरपंच ससाणे यांनी मंत्री तनपुरे यांचा सत्कार केला. यावेळी ना. तनपुरे यांनी ग्रामपंचायतीचे विकास काम करताना सर्वांना बरोबर घेऊन करण्याचे आश्वासन दिले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com