मंदिरे उघडण्यासाठी आता न्यायालयात जावे लागेल

आ. विखे : कोल्हार भगवतीपूर येथे शंखनाद आंदोलन
मंदिरे उघडण्यासाठी आता न्यायालयात जावे लागेल

कोल्हार |वार्ताहर| Kolhar

मुख्यमंत्री स्वत: घरात बसले अन् देवांनाही डांबून ठेवले. अजून किती दिवस कायद्याचा धाक दाखवून तुम्ही भाविकांना वेठीस धरणार, असा सवाल भाजपा नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील (BJP MLA Radhakrishna Vikhe Patil) यांनी केला. महाविकास आघाडी सरकार (MAhavikas Aghadi Government) आम्हाला रस्त्यावर येण्यास भाग पाडणार असेल तर कोणतीही लढाई करण्याची आमची तयारी आहे. मंदिरांसाठी आता यापुढची लढाई आम्हाला न्यायालयातच करावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

भारतीय जनता पक्षाच्या (Bharatiya Janata Party) अध्यात्मिक आघाडीच्यावतीने (spiritual front) राज्यातील मंदिर सुरु करावीत म्हणून आंदोलने करण्यात आली. अध्यात्मिक आघाडीच्यावतीने श्रीक्षेत्र कोल्हार भगवतीपूर (Kolhar Bhagawatipur) येथील भगवतीमाता मंदिराच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या शंखनाद आंदोलनात आ. विखे पाटील सहभागी झाले. शासनाच्या नाकर्तेपणावर त्यांनी सडकून टिका करताना भाविक, वारकरी आणि अध्यात्म क्षेत्रातील व्यक्तींच्या भावनांशी तुम्ही खेळू नका, यापूर्वी पंढरपूरच्या (Pandharpur) वारीवर बंधन घालून तुम्ही वारकर्‍यांचा अपमान केलेलाच आहे. आता अधिक अंत पाहू नका अन्यथा या भावनांचा उद्रेक होईल, अशा शब्दात त्यांनी सरकारला खडे बोल सुनावले.

या आंदोलनात माजीमंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, डॉ. भास्करराव खर्डे, सभापती नंदाताई तांबे, बबलू म्हस्के, अशोक आसावा, सरपंच दत्तात्रय राजभोज, उपसरपंच प्रकाश खर्डे, उपसरपंच सविता खर्डे, संचालक धनंजय दळे, स्वप्नील निबे, नवनाथ महाराज म्हस्के, भारत महाराज धावणे, भाऊसाहेब घोलप, शिवाजीराव घोलप, अण्णासाहेब बेंद्रे, विजय तांबे, अमोल थेटे आदींसह अध्यात्मिक क्षेत्रातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मंदिर सुरु करण्याच्या मागणीचे निवेदन आ. विखे पाटील यांनी तहसिलदारांना सादर केले.

राज्यात एकीकडे दारूची दुकाने सरकारने सुरू केली. लसीचे दोन डोस घेतलेल्या व्यक्तींना तुम्ही मॉलमध्ये परवानगी दिली. मुंबईमधील लोकलही सुरु केल्या. मग मंदिरांबाबतच एवढी उदासिनता का? असा सवाल उपस्थित करून आ. विखे पाटील म्हणाले की, या सरकारच्या विरोधात सर्वच समाज घटकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागत आहे. आध्यात्मिक क्षेत्रही आता बाजूला राहीलेली नाहीत. मंदिरांची दारे उघडावीत म्हणून दीड वर्षापासून सर्वांची मागणी आहे. पण या बहिर्‍या, मुक्या, आंधळ्या महाविकास आघाडी सरकारला कोणत्याही भावना राहिलेल्या नाहीत, अशा शब्दांत महाविकास आघाडी सरकारवर टीका केली.

अधिवेशन आलं की, राज्यातील कोविड वाढतो. सण, उत्सव आले की, या सरकारला लॉकडाऊनची आठवण होते. शाळा सुरू करण्यासाठीही सरकार तारीख पे तारीख जाहीर करते. हे सरकार संपूर्णपणे गोंधळलेले आहे. या सरकारने घेतलेले निर्णय शेवटपर्यंत टिकत नाहीत, मंदिरं बंद ठेवली मग मंत्र्यांचे दौरे थांबलेत का? मुख्यमंत्री स्वत: घरात बसले अन् देवांनाही डांबून ठेवले. अजून किती दिवस कायद्याचा धाक दाखवून तुम्ही भाविकांना वेठीस धरणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

मंदिर परिसरातील व्यावसायिकांना दिलासा देण्यासाठी आणि भाविकांच्या श्रध्देचा सन्मान करण्यासाठी मंदिरं सुरू करण्याचा निर्णय तातडीने घ्या अन्यथा सरकारच्या विरोधात यापेक्षाही तिव्र आंदोलन करण्याचा इशारा आ. विखे पाटील यांनी दिला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com