
शिर्डी | शहर प्रतिनिधी
हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) म्हणायला निघालेल्याना देशद्रोहाचे कलम लावायचे आणि तिकडे औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहणाऱ्यांच्या बाबतीत फक्त गाडण्याची भाषा करणाऱ्या शिवसेनेच्या (Shivsena) फक्त तोंडात बळ असल्याने ते कृती करू शकत नसल्याची घणाघाती टीका भाजप आ. राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी केली आहे.
शिर्डी (Shirdi) येथे माध्यमांशी संवाद साधतांना आ. विखे पाटील म्हणाले की, एका बाजुला हिंदूत्वाची (Hindutva) नौटकी करायची आणि दुसरीकडे हिंदुत्व गुंडाळून ठेवायचे असे चित्र शिवसेनेचे पाहायला मिळत आहे. सत्तेत असतांनाही जे संभाजीनगरच नाव बदलू शकले नाहीत. एकप्रकारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या भूमिकेलाच त्यांनी हरताळ फासला असल्याची टिका त्यांनी केली.
महाविकास आघाडी सरकारने (MVA Govt) सगळे नियम धाब्यावर बसविले आहेत. शिवसेना व राज्य सरकारच्या विरोधात जो बोलेल तो देशद्रोही व औवेसींसारख्या लोकांनी त्यांचे गोडवे गायले तर तो सरकारचा तारणहार असल्याचे यातून स्पष्ट होत असल्याचे ते म्हणाले.
तसेच मुळातच शिवसेना गोंधळलेल्या स्थितीत आहे. त्यांना त्यांचे हिंदुत्व समजेनासे झाले आहे. धर्म निरपेक्षता काय हेही त्यांना माहीती नाही. प्रत्येकवेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा घेतला जाणारा आधार आता फार काळ चालणार नाही. राज्यातील जनतेला कृती हवी आहे, ज्या तत्वासाठी शिवसेना सत्तेवर आली त्या मूळ हिंदूत्वालाच त्यांनी गुंडाळून ठेवले असल्याची टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.