'अपयश झाकण्‍यासाठी केंद्राकडे बोट दाखविणे हा एककलमी कार्यक्रम सुरू'

आ. विखेंनी साधला महाविकास आघाडी सरकारवर निशाणा
'अपयश झाकण्‍यासाठी केंद्राकडे बोट दाखविणे हा एककलमी कार्यक्रम सुरू'

अहमदनगर | Ahmednagar

महाविकास आघाडी सरकार हे कोणत्‍याही विषया संदर्भात गंभीर नसून सत्‍तेमध्‍ये टिकून राहणे हाच एकमेव कार्यक्रम आहे. सरकारचे अपयश झाकण्‍यासाठी केंद्राकडे बोट दाखविणे हा एककलमी कार्यक्रम सुरू आहे आणि हे सरकार आर्थिक व्‍यवहार करण्‍यात गुंतले आहे...

या संदर्भात या सरकारची शोध पत्रिका काढणे गरजेचे आहे. मराठा समाजाचे आरक्षण सर्वोच्‍च न्‍यायालयाने रद्द केले आहे. हे आरक्षण न टिकण्‍यास सरकारचा नाकर्तेपणा जबाबदार आहे. माजी मुख्‍यमंत्री मा.श्री.देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सर्व कागदपत्राची जुळवा जुळव करून आरक्षण देण्‍याचे काम केले. परंतु या महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाचे आरक्षण घालण्‍याचे काम केले. मराठा समाजाला आरक्षण मिळून देण्‍यासाठी भाजप समाजा बरोबर आहे. भाजप सरकारने अनेक वर्षाची असणारी मराठा समाजाची मागणी पूर्ण केली. मात्र महाविकास आघाडी सरकाने सर्वोच्‍च न्‍यायालयात या आरक्षणा संबंधी जी बाजू मांडायला पाहिजे ती मांडली नाही. सर्वोच्‍च न्‍यायालयाचे कामकाज इंग्रजीत चालते आरक्षणाचे स्‍टेटमेंट मराठीत होते. हे सरकार त्‍याचे इंग्रजीत भांषातर करून देवू शकले नाही. तसेच सरकार भूमिका मांडण्‍यात कमी पडले. आजतागायत या सरकारने पुर्नयाचिका दाखल केली नाही.त्‍यामुळे मराठा समाजामध्‍ये अस्‍वस्‍थता पसरली आहे. समाज बांधव जी भूमिका घेतील त्‍यास आमचे समर्थन राहील. पक्ष म्‍हणून आमची भूमिका स्‍पष्‍ट आहे. मराठा आरक्षणाच्‍या लढाईसाठी कायदेशीर प्रक्रिया केली जाणार आहे. असे प्रतिपादन आ. राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केले.

नगर शहर व तालुक्‍यातील मराठा आरक्षणा बाबत समाजाशी संवाद साधताना माजी विरोधीपक्ष नेता राधा‍कृष्‍ण विखे पाटील समवेत माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, महापौर बाबासाहेब वाकळे, सकल मराठा समाजाचे अध्‍यक्ष चंद्रकांत गाडे, भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष अरूण मुंडे, भाजपाचे शहर जिल्‍हाध्‍यक्ष महेंद्रभैय्या गंधे, बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे, सभागृह नेते रविंद्र बारस्‍कर, निखील वारे, बाळासाहेब पवार, रेवण चोभे, अनिल करांडे, सुरेश सुंबे, बाबासाहेब खर्से, दिलीप भालसिंग, आदीसह मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले म्‍हणाले की, राधाकृष्‍ण विखे यांचे नेतृत्‍वाखालील राज्‍यभर मराठा आरक्षणाबाबत दौरा सुरू करण्‍यात आलेला आहे. मराठा आरक्षणा संदर्भात भाजपा सरकारचा कार्यकाळ सोडला तर सर्व काळ निराशाजनक गेला आहे. महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाला आरक्षण मिळून दिले नाही. माजी मुख्‍यमंत्री देंवेद्र फडणवीस यांच्‍या कडून मराठा समाजाच्‍या आशा पल्‍लवीत झाल्‍या होत्‍या, परंतु सरकार बदलले आणि या सरकारची भावना मराठा समाजाला आरक्षण देण्‍याची नाही. पक्षाचे झेंडे बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येवून मराठा आरक्षणासाठी लढा उभा केला पाहिजे. नगर शहरामध्‍ये मराठा समाजाच्‍या वतीने लवकरच सर्व समाजाच्‍या मुलांच्‍या शिक्षणासाठी भव्‍य असे वसतीगृह उभे केले जाणार आहे असे ते म्‍हणाले.

जिल्‍हाध्‍यक्ष चंद्रकांत गाडे म्‍हणाले की, राजकारणामुळे मराठा आरक्षणाचा चोथा झाला आहे. आता समाजाचा कोणावरही भरवसा राहिलेला नाही. विनाकारण आंदोलने करून मराठा समाजातील मुलांवर नाहक गुन्‍हे दाखल होत आहेत. वसतीगृहासाठी नगर शहरामध्‍ये फडणवीस सरकारने जागा देण्‍याचा प्रयत्‍न केला. परंतु काही अडचणीमुळे ती जागा मिळाली नाही. आता मनपाच्‍या माध्‍यमातून व मा.आ.श्री.संग्रामभैय्या जगताप , महापौर मा.श्री.बाबासाहेब वाकळे यांच्‍या माध्‍यमातून मिळणार आहे. मराठा समाजाची मोठया प्रमाणात गळचेपी झालेली आहे. नुसती चर्चा करून चालणार नाही तर कृती करा. आरक्षण जर मिळणार नसेल तर आर्थिक निकषावर देण्‍याचा प्रयत्‍न करा. आदीसह विविध मराठा समाजातील मान्‍यवरांनी आपली भुमिका मांडली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com