भाजपचा सुपडासाफ करण्यासाठी महाविकास आघाडी एकवटली

भाजपचा सुपडासाफ करण्यासाठी महाविकास आघाडी एकवटली

प्रा. शशिकांत गाडे यांनी घेतली गावकारभार्‍यांची बैठक : एकदिलाने लढण्याचा दिला सल्ला

अहमदनगर |तालुका प्रतिनिधी| Ahmednagar

लांबणीवर पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्याने ऐन हिवाळ्यातही गावोगावचे राजकारण चांगलेच तापले आहे.

नगर तालुक्यातील महाविकास आघाडीने कार्यकर्त्यांना एकत्रित करत कोणत्याही परिस्थितीत नगर तालुक्यातून भाजपाचा सुपडासाफ करायचाच, अशी वज्रमुठ आवळली आहे. दरम्यान, शिवाजी कर्डिले आता माजी आमदार झाल्याने त्यांचे नगर तालुक्यात काहीच अस्तित्व राहिले नसल्याचा टोला नगर तालुका महाविकास आघाडीचे नेते प्रा. शशिकांत गाडे यांनी लगावला.

नववर्षात नगर तालुक्यातील 59 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर नगर तालुक्यातील महाविकास आघाडीच्यावतीने गावोगावच्या कार्यकर्त्यांचा मेळावा नगरमध्ये आयोजित करण्यात आला होता.

यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके, जिल्हाध्यक्ष आशाताई निंबाळकर, शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र भगत, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष उद्धव दुसुंगे, काँग्रेसचे संपतराव म्हस्के, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ, गोविंदराव मोकाटे, इंजि. प्रविण कोकाटे, उपसभापती रवींद्र भापकर, रोहिदास कर्डिले, किसनराव लोटके, बाबासाहेब गुंजाळ, प्रकाश कुलट आदींसह गावोगावचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जि. प. उपाध्यक्ष प्रताप शेळके, हराळ, मोकाटे, भगत, दुसुंगे, निंबाळकर, कर्डिले, कोकाटे यांची भाषणे झाली.

जिल्हा बँक, बाजार समिती, ग्रामपंचायत, सोसायट्या जिंका

ग्रामपंचायतीपाठोपाठ सोसायट्या, बाजार समिती व जिल्हा बँकेची निवडणूक होणार आहे. गत बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने सत्ताधार्‍यांना चांगलाच घाम फोडला होता. महाविकास आघाडीची संधी थोडक्यात हुकली. परंतु, आता ते माजी आमदार झाल्याने तालुक्यातील जनता त्यांना स्विकारणार नाही. जिल्हा बँक व बाजार समिती जिंकायची असेल तर ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवावा लागेल, असे जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com