रेमडेसिवीरचा स्टॉक रोजच्या रोज समाजमाध्यमांवर जाहीर करावा

भाजपाचे प्रांताधिकार्‍यांना निवेदन
रेमडेसिवीरचा स्टॉक रोजच्या रोज समाजमाध्यमांवर जाहीर करावा

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

खाजगी कोव्हिड हॉस्पिटल चालकांनी करोना रूग्णांकडून सुरुवातीलाच अ‍ॅडव्हान्स म्हणून मोठ्या रकमेची मागणी न करता

रोजच्या रोज भरणा करून घ्यावा, श्रीरामपुरातील रेमडेसिवीरचा स्टॉकिस्टकडील स्टॉक प्रशासनाने रोजच्या रोज समाजमाध्यमांवर जाहीर करावा, करोना संदर्भात विविध उपचारांच्या प्रकाराचे शासनाच्या परिपत्रकानुसार ठरविलेले दर सर्व हॉस्पिटलच्या दर्शनी भागात लावावे, या मागण्यांचे निवेदन भाजपच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकारी अनिल पवार यांना दिले.

भाजपच्या ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश चित्ते, कामगार आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र चव्हाण, नगरसेवक किरण लुणीया, संजय पांडे, अभिजीत कुलकर्णी आदींचा या शिष्टमंडळात सहभाग होता.

श्रीरामपुरातील कुठल्याही कोव्हिड हॉस्पिटलमध्ये पेशंटला अ‍ॅडमिट करताना अ‍ॅडव्हान्स म्हणून मोठ्या रकमेचा भरणा करून घेतला जातो. मध्यमवर्गीय व गरीब कुटुंबाकडे एकाच वेळेला एवढे पैसे भरण्याची ऐपत नसते. त्यामुळे अशा कुटुंबांना पेशंटवर उपचार करून घेणे अवघड होऊन जाते. म्हणून पेशंटच्या रोजच्या उपचाराचे पैसे रोजच्या रोज भरून घेण्यात यावे, अशी मागणी यावेळी प्रांताधिकारी यांच्याकडे करण्यात आली.

यामुळे गोरगरिबांच्या व मध्यमवर्गीय पेशंटच्या उपचाराचे अनेक प्रश्न सुटतील. सध्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा असून आजही श्रीरामपुरात त्याचा काळाबाजार सुरू आहे. याला आळा घालण्यासाठी प्रशासनाने श्रीरामपुरातील स्टॉकीस्टकडील स्टॉक रोजच्या रोज समाज माध्यमांवर जाहीर करावा. नाशिक जिल्ह्यात तालुकानिहाय अशा पद्धतीने स्टॉक रोज समाज माध्यमांवर जाहीर केला जातो. त्यामुळे जनतेच्या मनातील शंका दूर होऊन स्टॉकचा रोज उपयोग झाला की नाही हे प्रशासनाला समजेल.

शासनाने करोना उपचारासंदर्भातील उपचार पद्धतीवर प्रत्येक उपचाराचे दर निश्चित केलेले असून शासनाने या दराचे अधिकृत परिपत्रकही काढले आहे. त्यानुसार सर्व कोव्हिड हॉस्पिटलला साधा बेड, आरटीपीसीआर टेस्ट, रॅपिड टेस्ट यासारख्या अनेक उपचारांचे दरपत्रक आपल्या दर्शनी भागात लावण्यास सांगावे, अशी मागणीही यावेळी प्रांताधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com