भाजप नेत्यांच्या हातून विकास कामांचे उद्घाटन

शिवसेना नगरसेवकांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार - कलविंदरसिंग डडीयाल
भाजप नेत्यांच्या हातून विकास कामांचे उद्घाटन

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडी सरकार असून राज्याचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे पदाधिकारी व सर्व शिवसैनिकांना सहकारी पक्षाच्या सोबत राहून महाविकास आघाडीचा धर्म पाळण्याचे आदेश दिले आहेत. मात्र कोपरगाव शहरातील शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी नुकतेच शहरातील विकास कामांचे उद्घाटन भाजप नेत्यांच्या हातून केले आहेत. या नगरसेवकांची राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे कोपरगाव शिवसेना शहरप्रमुख कलविंदरसिंग डडीयाल यांनी सांगितले.

कोपरगाव शहरात रविवारी हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशी कोपरगाव शहरातील शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी भाजपाचे विवेक कोल्हे यांच्या हस्ते कोपरगाव शहरातील विकास कामांचे उद्घाटन केल्यामुळे शिवसेना शहरप्रमुख कलविंदरसिंग डडीयाल यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सच्चा शिवसैनिक हा शिवसेना प्रमुखांच्या आदेशावर चालतो. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेनेचे पदाधिकारी व सर्व शिवसैनिक महाविकास आघाडीचा धर्म पाळत आहे. मात्र काही शिवसेनेच्या नगरसेवकांनी हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशीच भाजप नेत्यांच्या हाताने विकासकामांचे उद्घाटन करून पक्षाच्या आदेशाचा भंग केला आहे. त्याबाबतचा सविस्तर अहवाल पक्षश्रेष्ठींकडे पाठविणार आहे.

शिवसेनेचे नगरसेवक जर पक्षप्रमुखांचा आदेश पाळत नसतील तर ते शिवसैनिक कसले असे सांगत स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशीच असे दुष्कृत्य करायला कुणाचा छुपा पाठिंबा आहे याचा देखील शोध घेणे गरजेचे आहे. त्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसह व राज्याचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे कलविंदरसिंग डडीयाल यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.