वीजबिल वसुलीबाबत भाजपा पुढार्‍यांचे आरोप बुद्धीभेद करणारे

ना. प्राजक्त तनपुरेंची राहुरीच्या पत्रकार परिषदेत विरोधकांवर टीका
वीजबिल वसुलीबाबत भाजपा पुढार्‍यांचे आरोप बुद्धीभेद करणारे

राहुरी (तालुका प्रतिनिधी) -

महाविकास आघाडीचे सरकार शेतकर्‍यांचा, कष्टकर्‍यांचा विचार करणारे हित जोपासणारे सरकार आहे. त्यामुळे शेतकरी व घरगुती वीजबिल

AD

वसुलीसाठी पोलीस संरक्षण देऊन वसुली करणार हा विरोधकांचा आरोप पूर्णपणे बुद्धीभेद करणारा आहे. होणारी विकासकामे पाहून काही वैफल्यग्रस्त भाजपा पुढारी आपले राजकीय भविष्य धूसर होत चालल्याने नैराश्यातून आपल्या बोलण्याचा विपर्यास करीत असल्याचा सणसणीत टोला राज्याचे उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी लगावला आहे.

नगर येथील तेलीखुंट भागात दहशत करून महावितरण कर्मचार्‍याला कार्यालयात चाकूसारख्या शस्त्राने गुंड प्रवृत्तीच्या युवकाने जखमी केले. त्याबाबत कर्मचार्‍यांना पोलीस संरक्षण देणार, असे सांगून या गुंडाविरोधात गुन्हाही दाखल झाला आहे. परंतु केवळ या गोष्टीचा वीजबिल थकबाकीशी संबंध जोडून विरोधक बेतालपणे नैराश्यातून शेतकर्‍यांचा कळवळा असल्याचा व शासन शेतकर्‍यांवर दडपशाही करीत असल्याचा आरोप करीत आहेत, असा आरोप त्यांनी केला. ना. तनपुरे यांनी याबाबत पत्रकार परिषदेत पत्रकारांसमोर सविस्तर खुलासा केला व शेतकरी वीजबिल योजनेसंदर्भात सविस्तर माहिती दिली. कृषीपंपासाठी नवीन कृषी धोरण मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. यामध्ये शेतकर्‍यांना नवीन जोडण्या, नवीन ट्रान्सफॉर्मर बसविणे, दिवसा वीज देण्यासंदर्भात सोलर व इतर वीजनिर्मितीसाठी प्रयत्न सुरू आहेत.

महावितरण अडचणीत असताना थकबाकी संदर्भात दंडव्याज व 50 टक्के सवलत मिळवून जवळपास 70 टक्के वीजबिल थकबाकी शेतकर्‍यांसाठी माफ करीत आहे. यातूनही होणार्‍या वसुलीतून त्याच भागातील प्रलंबित कामे व सुधारणा केल्या जाणार आहेत. थकबाकी वसुलीला चांगला प्रतिसादही मिळत आहे. याबाबत अधिकार्‍यांनी शेतकर्‍यांकडे जाऊन गावोगाव बैठका घेऊन योजना शेतकर्‍यांना समजून सांगावी, प्रबोधन करावे, अशा सूचना देतानाच कोणत्याही शेतकर्‍याचे पूर्वसूचना न देता वीजपुरवठा बंद न करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. शेतकर्‍यांना थकबाकी सवलतीनंतरही तीन टप्पे पाडून देण्यात येत आहेत. तरी पोलीस बंदोबस्ताचा बेताल आरोप करून बुद्धीभेद करणार्‍या भाजपच्या प्रचाराला शेतकरी भुलणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राहुरी तालुक्यात दहावर्षात एकही नवीन ट्रान्सफार्मर न बसविणार्‍या लोकप्रतिनिधींनी वीजवितरणाचा बोजवारा उडविला होता. मागील एकवर्षाच्या काळात आपण जवळपास शंभर ट्रान्सफार्मर मंजूर केले असून ते बसविण्याचे कामही सुरू आहे. त्याचबरोबर अनेक सबस्टेशनची नवीन निर्मिती, काही सबस्टेशनची क्षमतावाढ आदी टेंडर प्रक्रिया सुरू आहे. शेतकर्‍यांनी विरोधकांच्या आरोपांकडे दुर्लक्ष करून बाकी योजना अधिकार्‍यांकडून समजावून घेताना आपल्याच भागातील विजेबाबतच्या पायाभूत सुविधा भक्कम करण्यासाठी या योजनेस प्रतिसाद द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. तालुक्यात येणार्‍या तीन वर्षात एकही ट्रान्सफार्मर राहणार नाही, तसेच शेतकर्‍यांना पुरेशा दाबाने दिवसा वीज मिळण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

AD
No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com