कृषी कायद्यांवर तातडीने प्रतिक्रिया देणारे मुख्यमंत्री एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाप्रश्नी गप्प का?

भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा सवाल
कृषी कायद्यांवर तातडीने प्रतिक्रिया देणारे मुख्यमंत्री एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाप्रश्नी गप्प का?

शिर्डी | शहर प्रतिनिधी

केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेतल्यानंतर यावर तातडीने प्रतिक्रिया देणारे राज्याचे मुख्यमंत्री एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाप्रश्नी गप्प का ? असा सवाल उपस्थित करत विश्वासघात करून आलेल्या सरकारने जनतेची व विविध घटकांची फसवणूक केली आहे, हीच सरकारची दोन वर्षाची कामगिरी असल्याचा उपरोधिक टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिर्डी येथे पत्रकारांशी बोलताना केली आहे.

दरम्यान भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी रविवारी सकाळी साईदरबारी हजेरी लावत साईसमाधीचे दर्शन घेतले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर,जिल्हा सरचिटणीस नितीन दिनकर, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष सचिन तांबे,भाजपचे शिर्डी शहराध्यक्ष सचिन शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक पवार, प्रदेश सदस्य किरण बोराडे, भाजयुमोचे शिर्डी शहराध्यक्ष योगेश गोंदकर, प्रसिद्धी प्रमुख राम आहेर, लखन बेलदार आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलतांना उपाध्ये म्हणाले की, महाविकास आघाडीच्या दोन वर्षाच्या कारभारावर सडाडून टीका करत विश्‍वासघात व फसवणूक करून आलेल्या सरकारने जनतेची फसवणूक चालवली आहे. सरकारच्या दोन वर्षाच्या कामकाजाची गोळाबेरीज केली तर फसवणूक करणारे सरकार असल्याचे लक्षात येते. भाजपा सरकारने यापूर्वी मराठा आरक्षण मिळवले आणी टिकवले होते, परंतु महाविकास आघाडी सरकारला मराठा आरक्षण कोर्टात प्रभावीपणे मांडता आले नाही. त्यांना मराठा आरक्षणाचे गांभीर्य न कळल्याने आरक्षण मिळाले नाही. परिणामी मराठा समाजाचे फार मोठे नुकसान या सरकारने केले आहे.

तसेच ओबीसी संदर्भात जो डेटा देणे गरजेचे होते, तो सरकारला सादर न केल्याने ओबीसीचे राजकीय आरक्षण सुद्धा टिकले नाही. मराठा समाजाबरोबरच ओबीसी समाज बांधवांची आरक्षणप्रश्नी या सरकारने फसवणूक केली आहे. त्यामुळे ओबीसीचे राजकीय आरक्षण देखील टिकू शकले नाही. सरकारच्या या दोन वर्षाच्या कालावधीत महिलांचे असुरक्षितता वाढली आहे. एका मंत्र्याला महिला अत्याचार प्रश्नी राजीनामा द्यावा लागला.

तर कोव्हीड सेंटरसुद्धा महिलांच्या अत्याचारातून सुटले नाही असे सांगत राज्यातील महिला अत्याचार व बलात्कार घटना बघता राज्यातील महिला असुरक्षित असल्याचे आरोप त्यांनी केला.अनुसूचित जाती जमाती आयोग नेमण्यास या सरकारने विलंब केला आता कुठे आयोग नेमला, तर त्या आयोगाला निधी नाही. त्यामुळे अनुसूचित जाती जमाती नागरिकांच्या समस्या बरोबरच विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्तीचा प्रश्न बिकट बनला आहे. या वर्गाची सुद्धा शासनाने फसवणूक केली आहे.

परीक्षा संदर्भात स्वतःच्या स्वार्थासाठी २१ वेळा ठेका बदलण्याचा पराक्रम या सरकारने केला असून उत्तर प्रदेश व बिहार सारख्या राज्यात बंद असलेल्या कंपनीला ठेका देऊन काय साध्य केले. मंदिर बंद मात्र बार सुरू असा तर या सरकारचा कारभार राहिला आहे. पेट्रोल-डिझेलचे दर कपात करण्यातही सरकार राजकारण करत असून सर्वसामान्यांसाठी सरकारने कोणते पॅकेज दिले असा प्रश्नही यावेळी त्यांनी उपस्थित केला. एसटीचे खाजगीकरण करण्याचा डाव या सरकारचा असून सरकारमधील एका पक्षाने जाहीरनाम्यात एसटी कर्मचाऱ्यांना संदर्भात दिलेली आश्वासने पूर्ण करण्यास काय अडचण आहे. मुळात विश्वासघात व फसवणूक करून आलेल्या सरकारकडून जनतेची फसवणूक होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

साईबाबांच्या दर्शनासाठी येणारा भक्त हा दर्शनासाठी उत्सुक असतो, लाडू प्रसाद असो अथवा महाप्रसाद त्याचा लाभ भक्तांना मिळणे गरजेचे असताना संस्थानने दर्शन सुरू करून प्रसाद देणे व प्रसादालय बंद ठेवणे हे अत्यंत चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com