आणखी तीन बड्या मंत्र्यांची प्रकरणे हाती

मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळाही लवकरच बाहेर काढणार
आणखी तीन बड्या मंत्र्यांची प्रकरणे हाती
किरीट सोमय्या

पारनेर |प्रतिनिधी| Parner

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार गुंड माफियांचे आहे. त्यांचे ठेकेदार आणि शिष्य सामान्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे लोक आता त्यांच्या गैरव्यवहारांच्या तक्रारी माझ्याकडे घेऊन येत आहेत. गेल्या तीन दिवसांत आणखी तीन बड्या मंत्र्यांची प्रकरणे हाती आली आहेत. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळाही लवकरच बाहेर काढणार आहे. कितीही धमक्या दिल्या तरी मी थांबणार नाही, असे आव्हान भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिले.

सोमय्या यांनी गुरूवारी पारनेर येथील साखर कारखान्यांला भेट दिली. त्यानंतर सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी सांगितले की, मी जे काम करतो, त्याला आरोप म्हणून नका. मी तपास यंत्रणांना माहिती आणि पुरावे देऊन पाठपुरावा करीत असतो. पारनेर कारखान्यांच्या विक्रीतही संशयास्पद व्यवहार झाला आहे. त्यामुळे त्यानुसार त्याची चौकशी सुरू आहे. आता त्याला गती आली आहे, असेही ते म्हणाले. पारनेर कारखान्यांच्या बाबतीतही बचाव समिती मला येऊन भेटली. केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांनी लक्ष घालण्याची सूचना केली. त्यामुळे मी येथे आलो आहे. यामध्ये पक्षीय संबंध येत नाही.

कोल्हापूरमध्ये त्यांच्यावर झालेल्या कारवाईबद्दल पोलिस आणि राज्य सरकारवर त्यांनी कडाडून टीका केली. ते म्हणाले, कोल्हापूर पोलिसांनी जी वागणूक दिली, त्याबद्दल मी मुंबईतील पोलिस तक्रार निवारण प्राधिकरणाकडे तक्रार करणार आहे. मला अंबाबाईचे दर्शन घेण्यापासून रोखत आहेत, त्यामुळे पुढील आठवड्यात मी मानवी हक्क आयोगाकडे तक्रार करणार आहे. ठाकरे, पवार हे दोन ठेकेदार आणि त्यांचे शिष्य एकत्र झाल्याने महाराष्टात हाहाकार माजला आहे. सामान्य माणूस त्यांच्याविरोधात तक्रार करू शकत नाही, अशी परिस्थिती आहे.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावावर अलिबाग समुद्र किनार्‍यावर 19 बंगले खरेदी केले आहेत. हा व्यवहार संशयास्पद आहे. तसेच परिवहन मंत्री अनिल परब यांनी करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या काळात कोट्यावधी रुपये खर्च करून रिसॉर्ट उभारण्याचा प्रकारही संशयास्पद असल्याचे विविध आरोप सोमय्या यांनी केले.

साखर उद्योग आणि पवार कुटुंब हे समानार्थी शब्द आहेत.जरंडेश्वर साखर कारखाना ओंकार बिल्डरने राज्य सहकारी बँकेकडून लिलावात विकत घेतला आणि लगेचच पवार कुटुंबियांना भाडेपट्ट्यावर चालवण्यास दिला. ओंकार बिल्डरने जरंडेश्वर विकत घेण्यासाठी पैसे कसे उभे केले याची चौकशी झाली पाहिजे. तसेच पारनेर साखर कारखाना विकत घेण्यासाठी क्रांती शुगर विकत घेण्यासाठी भांडवल कसे उभे केले याची चौकशी झाली की सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील. या उद्योगांमागे कोण आहे हे जनतेच्या लक्षात येईल असे सोमय्या म्हणाले.

Related Stories

No stories found.