भाजप सर्व निवडणुका कमळ चिन्हावरच लढवणार

जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, श्रीरामपुरात आढावा बैठक
भाजप सर्व निवडणुका कमळ चिन्हावरच लढवणार

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

भारतीय जनता पक्ष येणार्‍या नगरपालिका निवडणुकीसह जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका स्वबळावर, कमळ या पक्ष चिन्हावरच लढविणार असल्याची स्पष्ट ग्वाही पक्षाचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी श्रीरामपूर येथे पुन्हा एकदा दिली.

आगामी नगरपालिका निवडणुकांच्या तयारी संदर्भात गोंदकर यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी सायंकाळी श्रीरामपूरच्या शासकीय विश्रामगृहात पक्ष कार्यकर्त्यांची तातडीची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्हाध्यक्ष गोंदकर यांनी आगामी निवडणुकांबाबतची पक्षाची भूमिका स्पष्ट करतानाच कार्यकर्त्यांना नगरपालिकेसह जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले. तसेच निवडणूक रणनिती संदर्भात मार्गदर्शन केले पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते व शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शशिकांत कडुसकर बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.

यावेळी शहराध्यक्ष मारूती बिंगले यांच्यासह कार्यकर्त्यांनी आगामी नगरपालिका निवडणूक कोणत्याही परिस्थितीत पक्षाने स्वबळावर व कमळ पक्षचिन्हावरच लढवावी, अशी आग्रही भूमिका मांडली. जिल्हा सरचिटणीस सुनील वाणी यांनी बुथ प्रमुख व शक्ती केंद्रप्रमुख यांना सोबत घेऊन पक्ष कार्यकर्त्यांनी तातडीने संपर्क मोहीम हाती घेऊन विविध कारणास्तव पक्षापासून दूर गेलेल्या जुन्या निष्ठावंतांना सुद्धा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी केले.

Related Stories

No stories found.