भाजप-बाळासाहेबांची शिवसेनेच्या दोन युवा नेत्यांमध्ये वाद
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
मेहकरी (ता. नगर) येथील एका विवाह सोहळ्यात मंगळवारी रात्री किरकोळ कारणातून भाजप व बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या दोन युवा नेत्यांमध्ये वाद झाले. दरम्यान यानंतर केडगाव उपनगरातील हाॅटेल रंगोलीवर सात ते आठ चारचाकी वाहनातून आलेल्या जमावाने दगडफेक केली. यामुळे केडगाव मध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
मंगळवारी रात्री मेहकरी येथे एका विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते. या विवाह सोहळ्यासाठी भाजपाचा युवा नेता आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचा युवा नेता हजर होते. किरकोळ कारणावरून त्यांच्यात वाद झाले. या वादानंतर काही वेळातच केडगाव येथे सात ते आठ चारचाकी वाहनातून आलेल्या जमावाने येथील रंगोली हाॅटेलवर दगडफेक केली. या दगडफेकीत हाॅटेलमधील ग्राहक किरकोळ जखमी झाल्याची माहिती समजते.
दगडफेकीमुळे हाॅटेलच्या बाहेर उभ्या असलेल्या वाहनांच्या काचा फुटल्या आहे. दरम्यान घटनेची माहिती पोलिसांना मिळताच अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलीस उपअधीक्षक अनिल कातकाडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, कोतवालीचे निरीक्षक संपत शिंदे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा, नगर तालुका, एमआयडीसी, भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी व अंमलदारांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत केडगावसह नगर शहरात तणावपूर्ण परिस्थिती होती. यासंदर्भात रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता.