करोना नियम धाब्यावर बसवून आरोग्य केंद्रावर वाढदिवस साजरा

करोना नियम धाब्यावर बसवून आरोग्य केंद्रावर वाढदिवस  साजरा

अहमदनगर (प्रतिनिधी) - करोनाच्या गंभीर परिस्थितीत कार्यालयात वाढदिवस साजरा केल्यामुळे महापालिका प्रशासनाने काही अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांना नोटिसा काढल्याचे प्रकरण ताजे असताना पुन्हा मुकुंदनगर आरोग्य केंद्रातील एका महिला कर्मचार्‍याचा वाढदिवस करोना नियमांना हरताळ फासत धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. मनसेचे जिल्हा सचिव नितीन भुतारे यांनी ही बाब उघडकीस आणली आहे.

महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांचा वाढदिवस चार दिवसांपूर्वी कार्यालयात धुमधडाक्यात साजरा झाला होता. गाण्याची मैफिल जमवत सेलिब्रेशन झालेला हा वाढदिवस वादाच्या भोवर्‍यात सापडला. महापालिका प्रशासनाने आरोग्य अधिकारी बोरगे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. त्यांना खुलासा करण्याचे आदेशही दिलेत. हे प्रकरण ताजे असतानाच आता नगर शहरातील मुकुंदनगर लसीकरण केंद्रावर पुन्हा एकदा वाढदिवसाचा उत्सव साजरा झाल्याचे समोर आले आहे.

मुकुंदनगरमधील लसीकरण केंद्रात एका महिला कर्मचार्‍याचा वाढदिवस साजरा होत असल्याची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. हा वाढदिवस साजरा करताना सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करण्यात आलेले दिसत नाही. एकाही महिला कर्मचार्‍याच्या तोंडाला मास्कही नाही. यासंदर्भात नितीन भुतारे हे महापालिका आयुक्तांकडे तक्रार करणार आहेत. आयुक्त त्यावर काय कारवाई करणार याकडे नगरकरांचे लक्ष लागून आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com