कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

कृपक भारती को ऑप. संस्था अर्थात कृभकोने महाराष्ट्रातील युरियाची गरज लक्षात घेऊन मागील वर्षीच्या तुलनेत चार लाख मे.टनापेक्षा जास्त युरीयाचा पुरवठा करावा,

अशी मागणी कृभकोचे जनरल बॉडी प्रतिनिधी, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी आज पार पडलेल्या सर्वसाधारण सभेप्रसंगी केली आहे.

नवी दिल्ली येथे कृभकोचे अध्यक्ष चंद्रपाल सिंह यादव यांचे अध्यक्षतेखाली ऑनलाईन सभा घेण्यात आली. यावेळी कृभकोचे व्यवस्थापकीय संचालक राजन चौधरी यांनी प्रास्ताविक केले. देशभरातून कृभकोचे 60 ठिकाणांहून या बैठकीसाठी सदस्य जोडले गेले होते. नागपूर, पुणे आणि कोपरगाव याठिकाणी महाराष्ट्रातील प्रतिनिधींनी आपला सहभाग नोंदविला.

कोपरगाव येथील सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर पार पडलेल्या कृपक भारती को ऑप संस्था नवी दिल्लीच्या कृभकोच्या 40 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेप्रसंगी श्री.कोल्हे यांनी मागणी केली.

कोपरगाव येथे झालेल्या या सभेसाठी जनरल बॉडी प्रतिनिधी रामनाथ चिंधू, भगवानराव काजे, पराग संधान, डी. पी.मोरे, जनरल मॅनेजर शिवाजीराव दिवटे, टि.आर. कानवडे तसेच कृभकोचे अधिकारी धनाजी देषमुख, सुदर्शन पाटील, अहमदनगर व शेतकरी सहकारी संघाचे व्यवस्थापक हरिभाऊ गोरे उपस्थित होते.

श्री कोल्हे म्हणाले, मागील वर्षात कृभकोने 4 लाख मे. टन युरियाचा पुरवठा महाराष्ट्राकरिता केला होता, परंतु यावर्षी 1 लाख 85 हजार मे.टन इतका पुरवठा केलेला असल्याने त्यामध्ये वाढ करून मागील वर्षाप्रमाणे महाराष्ट्रासाठी युरीयाचा तुटवडा लक्षात घेऊन कृभकोने याहीवर्षी 4 लाख मे.टन युरीयाचा पुरवठा करावा त्याचप्रमाणे मागील वर्षीच्या कंपोस्ट खताचा 5 हजार मे.टन पुरवठा केला होता त्या पुरवठ्यात वाढ करून यावर्षी कंपोस्ट खते 10 हजार मे.टन पुरविण्यात यावी.

यावेळी संस्थेचे चेअरमन चंद्रपाल सिंह यादव यांनी कृभको सभासद संस्थांकरिता 15 टक्के लाभांशाची घोषणा करून महाराष्ट्रकरिता झालेल्या युरियाच्या मागणीसंदर्भात अनुकुलता दर्शविली तसेच मागील वर्षाच्या मिश्र खताच्या विक्रीमध्ये वाढ झाल्याने समाधान व्यक्त करून महाराष्ट्रातील प्रतिनिधींचे अभिनंदन केले.