बायोडिझेल विक्रीत ‘बड्या’ व्यक्तींचा सहभाग

कोतवालीच्या गुन्ह्यात 20 आरोपी: 12 पसार
बायोडिझेल विक्रीत ‘बड्या’ व्यक्तींचा सहभाग

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा पुरवठा विभाग व कोतवाली पोलिसांनी केडगाव बायपास चौक परिसरात टाकलेल्या छाप्यात बायोडिझेलचा साठा जप्त केला होता. याप्रकरणी सोमवारी रात्री पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. ते सध्या पोलीस कोठडीत असून त्यांच्याकडील माहितीच्या आधारे गुन्ह्यातील आरोपींची संख्या वाढली आहे. या गुन्ह्यात एकूण 20 आरोपी झाले असून त्यात ‘बड्या’ व्यक्तींचा सहभाग आहे. दरम्यान आरोपी अटक करायचे असल्याने त्यांची नावे सांगण्यास पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांनी नकार दिला आहे.

22 ऑक्टोबर 2021 रोजी पोलीस व पुरवठा विभागाने केडगाव बायपास चौकातील हॉटेल निलच्या मागील बाजूस असलेल्या पार्कींगमध्ये टाकलेल्या छाप्यात दोन टँकरमधून मालवाहू ट्रकच्या इंधनाच्या टाकीमध्ये बायोडिझेल भरले जात असल्याचे आढळून आले होते. याप्रकरणी कोतवालीत गुन्हा दाखल आहे. सुरूवातीला दोन व नंतर सहा अशा आठ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. आता आरोपींची संख्या 20 झाली असून बायोडिझेल प्रकरणाची व्याप्ती वाढली आहे. 12 आरोपी पसार झाले असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.

पोलिसांकडून गोपनीयता

केडगाव उपनगरात सुरू असलेल्या या गोरखधंद्यात अनेकांची चांदी झाली आहे. पुरवठा विभाग, पोलिसांनी कारवाई करून बायोडिझेलचे रॅकेट उघडकीस आणले. मोठी आर्थिक उलाढाल यातून होत आहे. यामध्ये ‘बड्या’ व्यक्तींचा सहभाग असून त्यांची नावे आरोपींमध्ये सहभागी झाली असल्याचे सूत्रांनी सांगितले. पोलिसांकडून याप्रकरणाविषयी गोपनियता बाळगळी जात असून त्या बड्या व्यक्तींना अटक कधी होणार याकडे लक्ष लागून आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com