‘या’ तालुक्यात बिंगो अड्ड्यावर नगर पोलिसांची धाड

‘या’ तालुक्यात बिंगो अड्ड्यावर नगर पोलिसांची धाड

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी पोलिस ठाणे हद्दीत सुरू असलेल्या बिंगो मटका अड्ड्यावर अहमदनगर येथील अप्पर पोलिस अधिक्षक यांच्या आदेशाने तोफखाना पोलिसांनी दिनांक 15 जून रोजी धाड टाकून सुमारे चार लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करून जूगार्‍यांसह बिंगो मटका चालक व गाळा मालक असे एकूण 16 जणांना ताब्यात घेतले आहे.

राहुरी पोलिस ठाणे हद्दीतील नगर-मनमाड राज्य महामार्गावर कृषी उत्पन्न बाजार समिती समोर व हॉटेल अमर जवळ अनेक महिन्यांपासून बिंगो नावाचा हारजीतचा मटका सुरू होता. याबाबत अहमदनगर येथील अप्पर पोलिस अधिक्षक यांच्या आदेशाने तोफखाना पोलिस पथकाने त्या बिंगो मटका अड्ड्यावर दिनांक 15 जून रोजी सायंकाळी पाच वाजे दरम्यान धाड टाकून कारवाई केली. यावेळी त्या परिसरात जुगा-यांची चांगलीच पळापळ झाली. पोलिस पथकाने अनेकांना धुलाई करून ताब्यात घेतले. तसेच बिंगो मटका खेळण्याचे साहित्य, सहा मोटारसायकली व 23 हजार 50 रूपये रोख असा एकूण 3 लाख 35 हजार 550 रूपयांचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आला.

तोफखाना पोलिस ठाण्यातील हवालदार सचिन उत्तम जगताप यांनी राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विशाल राजु शिंदे, सनी राजु शिंदे, वैभव राजु शिंदे तिघे राहणार मुलन माथा, पाण्याचे टाकीजवळ राहुरी, बाळासाहेब श्रीधर पवार, दिपक बारकु बर्डे, चरस रावसाहेब बर्डे, संजय बाजीराव अहीरे चौघे राहणार वरवंडी, नानासाहेब बाबुराव सोडनर राहणार घोरपडवाडी, किरण भाऊसाहेब चव्हाण राहणार सडे, आकाश चंद्रकांत गुंजाळ, राहुल सोपान गुंजाळ, भाऊसाहेब सुखदेव गुंजाळ तिघे राहणार मुलन माथा, फिरोज शब्बीर शाहा राहणार कातोरे गल्ली, गणेश हीरामण खरात राहणार भिलहाटी, प्रगती शाळा रोड, श्रीकांत राजेंद्र परदेशी राहणार कासार गल्ली तसेच गाळा मालक, किरण गोटीराम भाबड राहणार राहुरी या 16 जणांवर मुंबई जुगार कायदा कलम नूसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना ताब्यात घेतले आहे.

या कारवाईत तोफखाना पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक आर. एन पिंगळे, पोलिस नाईक वाकचौरे, पठाण, इनामदार आदी सामिल होते. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक शिवाजी खरात हे करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com