राहुरी | प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यातील सोनगाव येथील जिल्हा सहकारी बँकेत बनावट सोने तारण ठेवून कर्ज घेतल्याप्रकरणी अरविंद विनायक नागरे या सराफासह

अन्य 21 जणांवर राहुरी पोलीस ठाण्यात बँकेचे शाखाधिकारी प्रवीणकुमार पाराजी पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भादंवि. कलम 409, 406, 420, 468 सह 34 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही.

दरम्यान, सर्व आरोपी हे सोनगाव व सात्रळ परिसरातीलच असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली. नागरे या सराफामार्फत सोने तारणावर कोट्यवधी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले होते. मात्र, बनावट सोने तारणाचे पितळ उघडे पडल्यानंतर जिल्हा बँकेचे प्रशासन खडबडून जागे झाले. त्यानंतर हे दागिने सोडवून घेऊन कर्ज भरण्याचे आवाहन करण्यात आले होते.

मात्र, काही खातेदार भरणा करण्यासाठी फिरकले नाहीत. तर दागिन्यांचीही पडताळणी करण्यासाठी बोलावले असता काहींनी पाठ फिरविली. यावर संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची तंबी जिल्हा बँकेच्या प्रशासनाकडून देण्यात आली होती. बनावट सोने ठेवून बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केलेल्या आरोपींना लवकरच अटक करणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांनी दिली.

गेल्या तीन ते चार वर्षापासून हे बनावट सोने तारण प्रकरण सुरू आहे. मात्र, त्यावर कसून चौकशीची प्रक्रिया बँकेकडून सुरू करण्यात आल्यानंतर बनावट सोन्याचे हे पितळ उघडे पडले आहे. बनावट सोने तारणासाठी ठेवून कोट्यवधी रुपयांचे कर्ज वाटप झाल्यानंतर या चर्चेला उधाण आले होते. दरम्यान, संबंधित सराफही पसार झाला होता. आता संबंधितांवर गुन्हे दाखल झाल्यामुळे कर्जदारांमध्ये खळबळ उडाली असून अनेकांचे धाबे दणाणले आहेत. बनावट सोनेतारण प्रकरण चव्हाट्यावर येताच सोनगाव-सात्रळ परिसरातील काही प्रतिष्ठितही पसार झाल्याची चर्चा आहे.

श्रीरामपुरातही झाला होता गुन्हा

जिल्हा बँकेच्या श्रीरामपूर शाखेतही काही महिन्यांपूर्वी बनावट सोने तारण ठेवून कर्ज घेतल्याप्रकरणी सराफावर गुन्हा दाखल झाला होता. यात बँकेत सोने तारण ठेवणार्यांपैकी अनेकजण अडचणीत सापडले होते. शेवटी या सराफावर गुन्हाही दाखल झाला. त्याला अटकही झाली. पण कर्जदारांना दिलासा मिळाला नाही.