राहाता पोलीस स्टेशन आवारातील बेवारस दुचाकी लिलावाच्या प्रतिक्षेत

राहाता पोलीस स्टेशन आवारातील बेवारस दुचाकी लिलावाच्या प्रतिक्षेत

बाळासाहेब सोनवणे

राहाता / Rahata - राहाता व शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीतील शेकडो महागडी दुचाकी वाहने अनेक वर्षापासून राहाता पोलीस स्टेशनच्या आवारात लिलाव होण्याच्या प्रतिक्षेत आहेत.

शिर्डी पोलीस स्टेशन नवीन इमारतीचे बांधकाम करण्यास जागा उपलब्ध नसल्यामुळे शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीत बेवारस आढळलेल्या, चोरीच्या गुन्ह्यातील वापरलेल्या व अपघात झालेल्या दुचाकी गाड्या गेल्या अनेक वर्षापासून राहाता पोलीस स्टेशनच्या आवारात उभ्या आहेत. राहाता, शिर्डी या दोन्ही ठिकाणच्या जवळपास 300 महागड्या किमतीच्या दुचाकी गाड्या अनेक वर्षांपासून ऊन, वारा, पाऊस हे तीनही ऋतू अंगावर घेत एकाच जागेवर उभे असल्याने गाड्यांच्या मशीन खराब होऊन गाड्यांना गंज चढला आहे. या गाड्यांचे साहित्य चोरी गेल्याची शक्यता नाकारता येत नाही.

शिर्डी व राहाता पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांनी सदर गाड्यांचे चेसी नंबर घेऊन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीरामपूर यांना गाडी मालकाची माहिती मागून सदर बेवारस असलेल्या दुचाकी मालकांना पत्रव्यवहार केला की नाही याबाबत प्रश्‍नचिन्ह आहे. चोरी झालेल्या दुचाकी वाहनांची माहिती घेण्यासाठी नागरिक पोलीस स्टेशनला येतात परंतु अनेकदा पोलिसांकडून योग्य प्रकारे माहिती मिळत नसल्यामुळे दुचाकी सापडूनही त्या व्यक्तीला ती मिळत नाही.

याविषयी पोलीस अधिकारी म्हणाले, यातील बहुतेक दुचाकी वाहने अपघातातील असल्यामुळे संबंधित मालकांना पत्रव्यवहार करूनही अपघातातील गाड्या घेऊन जाण्यासाठी बरेच नागरिक येत नाही. परिणामी या गाड्या अनेक वर्षांपासून याठिकाणी पडून राहतात. चोरी केल्यानंतर गुन्हेगार तिथून पसार होण्यासाठी दुचाकीचा वापर करतात व लांब अंतरावर चोरी केलेली दुचाकी सोडून पळून जातात. बर्‍याचदा चोरलेल्या दुचाकी नवीन असल्यामुळे. चोरी झालेल्या दुचाकीचे मालक नवीन गाडी मिळण्यासाठी इन्शुरन्स कंपनीकडे दावा करतात व अनेकांना नवीन गाड्या मिळाल्यामुळे चोरी झालेल्या गाड्यांचा शोध अनेक नागरिक घेत नाही. पत्रव्यवहार करूनही नवीन गाडी मिळाली असल्यामुळे जुन्या गाडीकडे कोणी लक्ष देत नाही. त्यामुळे बेवारस, चोरीच्या गुन्ह्यात वापरलेल्या व अपघातातील गाड्या अनेक वर्षांपासून याठिकाणी पडून आहेत.

पोलीस अधीक्षक यांच्या परवानगीने राहाता व शिर्डीतील पोलीस निरीक्षकांनी या गाड्यांचा लिलाव केला तर गरजू नागरिकांना याचा फायदा होऊ शकेल. दुचाकी वाहनाव्यतिरिक्त याठिकाणी ट्रॅक्टर, ट्रॉली, ट्रक, जेसीबी, जीप ही वाहने अनेक वर्षांपासून या ठिकाणी आहेत.

राहाता पोलीस स्टेशन आवारात गेल्या अनेक वर्षांपासून शिर्डी व राहाता हद्दीतील बेवारस सापडलेल्या दुचाकी एकाच जागेवर उभ्यो असल्याने त्यांना गंज पकडून मशीन खराब होत आहे. वाहनांचे साहित्य चोरी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित पोलिस अधिकार्‍यांनी या वाहनांचा तात्काळ लिलाव करणे गरजेचे आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com