
वैजापूर |प्रतिनिधी| Vaijapur
वैजापूर पोलीस ठाणे हद्दीत वाटमारीत दुचाकीस्वारांना लुटणार्या दोन चोरट्यांना पोलीस पथकाने अटक केली. या कारवाईत पोलिसांनी सराईत गुन्हेगार सौरभ उर्फ बाबू विकी रुझासिओ (वय 19, रा. ईनामवाडी, शिर्डी ता. राहाता, जि. अहमदनगर) व कृष्णा प्रकाश भोळे (वय 24, रा. आंबेडकरनगर, सिन्नर, जि. नाशिक) यांना पकडून त्यांच्याकडून बोलेरो जीप, लोंखडी रॉड, चाकू असे साहित्य जप्त केले.
याप्रकरणी ज्ञानेश्वर डुकरे यांच्या तक्रारीवरुन वैजापूर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. नागपूर-मुंबई हायवे रस्त्यावरून शिवराई, करंजगाव शिवारात बोलेरो (जीप क्रंमाक एमएच 23 एडी 1216) या वाहनातून चार चोरट्यांनी शिवराई शिवारात ज्ञानेश्वर डुकरे व त्यांच्या पत्नी यांना बेदम मारहाण करुन त्यांच्याकडील 90 हजाराचे सोन्याचे दागिने हिसकावून नेल्याची महिती मिळाल्यानंतर वैजापूरचे पोलीस निरीक्षक संजय लोहकरे यांनी आरोपींना पकडण्यासाठी तीन स्वतंत्र तपास पथके स्थापन केली होती. तीन ठिकाणी त्यांचे वाहन रोखण्यासाठी पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील नाकाबंदीचा अडथळा तोडून पसार होताना पोलिसांनी आरोपींचा पाठलाग करुन पुरणगाव रस्त्यावर एका शेतातून दोघांना अटक केली.
पोलीस अधीक्षक मनिष कलवानीया, अपर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवर, उपविभागीय पोलीस अधिकारी मुकुंद आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय लोहकरे, पोलीस उपनिरीक्षक मनोज पाटील, पोलीस उपनिरिक्षक रज्जाक शेख, सहायक फौजदार महादेव निकाळजे, सहायक फौजदार विठ्ठल जाधव, पोलीस अंमलदार योगेश झाल्टे, भगवान सिंघल, प्रशांत गिते, विजय भोटकर, वाल्मीक बनगे, गोरक्ष सदगीर, नवनाथ केरे, नवनाथ निकम, ज्ञानेश्वर पाडळे, गणेश पैठणकर, पोलीस नाईक सिमा जाधव व तीन होमगार्डच्या पथकाने ही कारवाई केली.