नेवासा l तालुका प्रतिनिधी l Newasa

तालुक्यातील कुकाणा परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या मोटारसायकल तीन चोरांना पकडण्यात पोलिसांना यश आले असून या चोरट्यांकडून चोरीच्या तीन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. गेल्या दीड-दोन महिन्यापासून कुकाणा व परिसरात मोटारसायकल चोरी व चोरीचा घटनेत वाढ झाली होती.

कुकाणा-चिलेखनवाडी शिवारात असलेल्या हॉटेल यशराज समोरून मंगळवार दि.15 रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी रविंद्र विश्वनाथ भारस्कर (वय-45) रा. तरवडी यांची बजाज कंपनीची प्लॅटिना विना नंबरची मोटारसायकल चोरून नेली. चोरटे यावेळी हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे कैद झाले होते. त्याच रात्री भारस्कार यांनी कुकाणे पोलिसांत दुचाकी चोरीची तक्रार दिली.

उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे व नेवासा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अभिनव त्यागी यांच्या मार्गदर्शनाखाली कुकाणा पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस नाईक किशोर काळे, पोलीस कॉन्स्टेबल नितीन भताणे, अमोल बुचकुल, दिलीप राठोड, आंबादास गीते हे गेल्या दोन दिवसांपासून संशयितांच्या मागावर होते.

त्यांनी बुधवारी रात्री रचून सतिष मोहन राशीनकर (वय 24), रविंद्र राजेंद्र सातदिवे (वय 27), अनिल रामभाऊ सातदिवे (वय 30) सर्व रा. कारेगाव ता.नेवासा यांना ताब्यात घेतले. पोलीसांनी या संशयितांची कसून चौकशी केली असता त्यांच्याकडून बाजाज कंपनीच्या दोन व होंडा कंपनीची एक अशा एकूण 65 हजार रुपये किंमतीच्या तीन चोरीच्या दुचाकी जप्त केल्या. याप्रकरणी नेवासे पोलिसांत वरील तीन आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.