
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
शहर व उपनगरातून दुचाकी चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. दुचाकी वाहनांची संख्या वाढल्यामुळे त्या चोरीला जाण्याच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल होत असले तरी दाखल गुन्हे उघडकीस आणण्याकडे अहमदनगर शहर पोलिसांचा कानाडोळा झाल्याचे दिसून येत आहे.
रविवारी तोफखाना पोलीस ठाणे हद्दीतून तीन तर एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतून एक अशा चार दुचाकी चोरीला गेल्या. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. अहमदनगर-औरंगाबाद रोडवरील आशिर्वाद लॉन्स येथून रविवारी दुपारी तीन ते साडेतीन वाजेच्या दरम्यान हल्लीयास करीम शेख (रा. भिंगारदिवे मळा, सावेडी) यांची दुचाकी चोरीला गेली. त्यांनी तोफखाना पोलिसांत फिर्याद दिली आहे.
त्याच दिवशी अहमदनगर-औरंगाबाद रोडवरील ताज लॉन जवळून दुपारी दोन ते साडेतीन वाजेच्या दरम्यान वसीम उस्मान शेख (रा. शुक्रवार बाजार, भिंगार) यांची दुचाकी चोरीला गेली. त्यांनी तोफखाना पोलिसांत फिर्याद दिली आहे. भिस्तबाग चौकातील देशी दारूच्या दुकानासमोरून एक दुचाकी चोरीला गेली. याप्रकरणी तोफखाना पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवनागापूर येथील मल्हारनगरमधून सुभाष नामदेव घाडगे यांची दुचाकी चोरीला गेली. त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.