तिघे दुचाकीचोर अटकेत, सहा वाहने जप्त

तिघे दुचाकीचोर अटकेत, सहा वाहने जप्त

घारगाव |वार्ताहर| Ghargav

पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोरीच्या 6 दुचाकी जप्त केल्या आहेत. या प्रकरणांत 3 जणांना अटक करण्यात आली असून त्यांचेकडून 3 लाख 68 हजार 217 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आशिष ढवळू भले (वय 23, रा. डिंगोरे, ता. जुन्नर, जि. पुणे), किशोर सुरेश काळे (वय 21, रा. भोजदरी, ता. संगमनेर), शिवाजी पोपट कातवरे (वय 21, रा. जांबुत, ता. संगमनेर) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दुचाकी चोरणार्‍या तरुणांची नावे आहेत.

पुणे जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. त्यामुळे दुचाकी वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, दुचाकी चोरीचा छडा लावण्यासाठी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला आवश्यक सूचना दिल्या होत्या. त्यानुसार बुधवारी (दि.25) स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अभिजित सावंत, पोलीस हवालदार दीपक साबळे, पोलीस नाईक संदीप वारे, पोलीस कॉन्स्टेबल अक्षय नवले, निलेश सुपेकर हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना आशिष भले हा त्याच्या इतर दोन साथीदारांसह मोटरसायकलची विक्री करण्यासाठी रोहकडी (ओतूर) येथे येणार असल्याची खबर मिळाली.

मिळालेल्या खबरीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावत वरील तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे दुचाकींबाबत चौकशी केली असता त्यांनी ओतूर, रांजणगाव, आळंदी तसेच नगर भागातून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्यांचेकडून सहा दुचाकींसह 3 लाख 68 हजार 217 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या तिघांवर जुन्नर तालुक्यातील ओतूर, शिरूर तालुक्यातील रांजणगाव, लोणी व अकोले येथील पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com