
नेवासा | तालुका प्रतिनिधी
उड्डाणपूलावरील वळणावर नियंत्रण सुटल्याने दुचाकी दुभाजकाला धडकल्यानंतर उड्डाणपूलावरून खाली कोसळून झालेल्या भीषण अपघातात नेवासा तालुक्यातील गोंडेगाव येथील तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्घटना गुरुवार दि.८ डिसेंबर रोजी दुपारी धुळे-सोलापूर हायवेवरील धाराशिव कारखाना उड्डाणपुलावर घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, संदीप कारभारी धाडगे (रा. गोंडेगाव ता. नेवासा (वय ३७ वर्ष) हा तरूण पत्नी अंजली सह दुचाकीवरून मुरूम येथील नातेवाईकांकडे जात होता. ही दुचाकी धुळे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरील येरमाळा येडशीच्या दरम्यान असलेल्या धाराशीव साखर कारखाना उड्डाणपुलावर आली असता, नियंत्रण सुटल्याने दुभाजकावर आदळली व दुचाकी उड्डाणपुलावरून खाली कोसळली.
या भीषण अपघातात तरूणाचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नीच्या गुडघ्याला किरकोळ दुखापत झाली आहे. आज शुक्रवार दि.९ रोजी दुपारी गोंडेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आला आहे. मयत संदीपच्या मागे पत्नी,तीन मुली,भाऊ असा परिवार आहे.