800 दुचाकी मालकांचा शोध सुरू

जप्त दुचाकींची कोतवाली पोलिसांकडून प्रक्रिया
800 दुचाकी मालकांचा शोध सुरू

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

कोतवाली पोलिसांनी गुन्ह्यात जप्त केलेल्या दुचाकी मूळ मालकांना परत देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून दुचाकी मालकांना त्यांची दुचाकी परत दिली जाणार आहे. जो कोणी दुचाकी घेऊन जाणार नाही, त्याच्या दुचाकीचा लिलाव केला जाणार आहे. कोतवाली पोलीस ठाण्यात सुमारे 800 दुचाकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

एखाद्या गुन्ह्यात जप्त केलेली, गुन्हा उघडकीस आल्यानंतर मुद्देमालात जप्त झालेली, बेवारस मिळून आलेली अशा सुमारे 800 दुचाकी कोतवाली पोलीस ठाणे आवारात पडून आहे. यातील काही दुचाकी केडगाव चौकीत आहे. पोलीस ठाण्याचा भाग या दुचाक्यांनी व्यापला आहे. सदरच्या दुचाकी वर्षांनुवर्षे याच ठिकाणी पडून आहेत. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशानुसार पोलीस ठाण्यातील जप्त वाहने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मूळ मालकांना परत देण्याची प्रक्रिया जिल्हाभर सुरू करण्यात आली आहे.

कोतवाली पोलिसांनीही त्याच्याकडील दुचाकी मालकांचा शोध सुरू केला आहे. पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार या दुचाकी मालकांचा शोध घेत आहे. कायदेशीररित्या दुचाकी मालकांना याबाबत कळविले जाणार आहे. संबंधित दुचाकी मालकाने त्याची दुचाकी सोडून घेऊन न गेल्यास न्यायालयाच्या परवानगीने दुचाकीचा लिलाव केला जाणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com