
शिर्डी (प्रतिनिधी) -
साईबाबा मंदिर अनलॉक होऊनही करोनाच्या भीतीमुळे गेल्या वर्षभरापासून शिर्डीत भाविकांची संख्या कमालीची घटत चालल्याने
शिर्डी शहरातील व्यावसायिक आणि नागरिकांना सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. वर्षानुवर्षे साईबाबांच्या झोळीतून मोठा निधी मिळवणार्या शिर्डी नगरपंचायतीने वसुली मोहीम थांबवून शहरातील नागरिकांचे सर्व प्रकारचे कर व गाळा भाड़े पूर्णपणे माफ करून शिर्डीकारांना दिलासा देण्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा अन्यथा शिर्डीकरांच्या मोठ्या उद्रेकाचा सामना नगरपंचायत प्रशासनाला करावा लागेल, असा इशारा प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते यांनी दिला.
शिर्डीत अर्थव्यवस्था पूर्णपणे भाविकांवर अवलंबून आहे. शेकडो कोटींचे बँकांकडून कर्जे घेऊन लहान-मोठ्या व्यावसायिकांनी आपले व्यवसाय सुरू केले आहेत. मात्र वर्षभरापासून करोनाच्या भितीमुळे शिर्डीत येणार्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणावर रोडावली असल्याने लहान मोठ्या व्यवसायाप्रमाणेच हॉटेल व्यावसायिक मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत. व्यावसायिकांच्या डोक्यावर मोठे कर्ज असून त्या कर्जाचे वर्षभरापासून हप्ते थकलेले आहेत. बँकांनी थकित कर्ज हप्त्यांच्या वसुलीसाठी तगादा लावलेला आहे. बँकाचे कर्ज कसे फेडावे या विवंचनेत नागरिक व व्यावसायिक असताना आता शिर्डी नगरपंचायतीने कर आणी गाळे भाड़े वसुलीसाठी मोहीम सुरू करून नागरिक आणि व्यावसायिकांच्या जखमेवर मिठ चोळत आहे. गेल्या दीड महिन्यात आर्थिक कारणाने शिर्डी परिसरात 11 आत्महत्या झालेल्या आहेत. याचे भान ठेवून शिर्डी नगरपंचायतीने सर्व प्रकारची वसुली मोहीम थांबवून वर्षभरातील सर्व मालमत्ता कर व गाळाभाडे माफ करण्याचा निर्णय घ्यावा.
आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनीही शिर्डीतील अर्थकारणाबाबत चिंता व्यक्त केली आहे. विखे पाटील यांचेशी विचारविनिमय करून शिर्डी नगरपंचायतीचे पदाधिकारी व प्रशासनाने आत्महत्या थांबवण्यासाठी तात्काळ निर्णय घेतला पाहिजे. यासाठी आपण स्वत: विखे पाटील यांनाच याप्रश्नी लक्ष घालण्याबाबत विनंती करणार असल्याचे कोते यांनी सांगीतले.
शिर्डी शहरातील व्यावसायिकांना उद्योगाचा दर्जा देता येईल का यावरही सरकार पातळीवर विचार व्हायला हवा. यासाठी शिर्डीतील व्यावसायिक व हॉटेल मालक यांच्यासमवेत विखे पाटील यांची बैठक लवकरच घेऊन त्यावर विचारमंथन केले जाईल. मात्र शिर्डीकर उद्भवलेल्या आर्थिक महाभयंकर संकटातून व्यावसायिकांना दिलासा देण्यासाठी शिर्डी नगरपंचायतीच्या प्रशासनाने तातडीने सर्व प्रकारच्या मालमत्ता करांची व गाड़े भाड्यांची सुरू केलेली पठाणी वसुली थांबवावी.
शिर्डी नगरपंचायतीने संकटात करांची व गाळे भाडे माफीबाबत ठराव करून सरकारकडे पाठवला असला तरी अशा ठरावांनी शिर्डीकरांच्या पदरात काहीच पडणार नाही. शिर्डी नगरपंचायतला वर्षानुवर्षे करोडो रुपयांचा कर देणारे व्यावसायिक संकटात असताना त्याच्यासाठी मदत करणे हे नगरपंचायतीचे उत्तरदायित्व आहे. शिर्डी नगरपंचायतीच्या पदाधिकार्यांनी सर्वप्रथम करांची आणि गाळा भाडे यांची वसुली थांबवून ती माफ करण्याबाबत ठराव करावा, असे आवाहनही कैलासबापू कोते यांनी केले.
शिर्डीतील व्यावसायिक, गाळेधारक आणि हॉटेल व्यावसायिकांना संकटकाळात कर आणि भाडे माफीसाठी आ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे मार्गदर्शन घेवून नगरपंचायत पदाधिकार्यांनी ठराव करून वसुली स्थगीत ठेवावी. सरकार पातळीवर विखे पाटील यांच्या माध्यमातून ठरावाला मान्यता आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. काहीही झाले तरी शिर्डीतील व्यावसायिकांना या आर्थिक संकटातून बाहेर काढावेच लागेल. त्यासाठी स्थानिक पातळीवर राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून एकत्रीत प्रयत्नांची गरज आहे.
- कैलासबापू कोते