बिग मीच्या दोघांचे जामिन फेटाळले

राज्यभरातून 7.50 कोटी फसवणूक
बिग मीच्या दोघांचे जामिन फेटाळले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

बिग मी इंडिया कंपनीच्या फसवणूक प्रकरणातील दोन आरोपींचा जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला आहे. कंपनीच्या सीईओ वंदना पालवे व शॉलमान गायकवाड अशी आरोपींची नावे आहेत.आरोपी वंदना पालवे व शॉलमान गायकवाड यांनी पुरवणी दोषरोपानंतर जिल्हा सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. आरोपींच्यावतीने ऍड.गुगळे व ऍड. पालवे यांनी जमीन अर्ज मंजूर व्हावा, यासाठी युक्तिवाद केला. सरकारी वकील ए.बी.पवार यांनी यांनी सरकार पक्षातर्फे युक्तिवाद केला.

तपासी अधिकारी पोलिस उपअधीक्षक जाधव यांनी जामीन अर्जासाठी विरोध केला. मुख्य फिर्यादी सतीश खोडवे, साक्षीदार उदय जोशीलकर, रोनक शहा, मारुती गडदे, दिनकर केदार, तेजस भस्मे, सुकुमार खवाटे यांनी लेखी म्हणणे मांडून जमीन अर्जसाठी विरोध केला होता. अखेर जिल्हा सत्र न्यायाधीश महेश जाधव यांनी दोन्ही आरोपींचा जामीन अर्ज नामंजूर केला. संपूर्ण राज्यातून 7.50 कोटी पेक्षा जास्त रक्कमेची गुंतवणूदारांची फसवणूक करणार्या बिग मी इंडिया कंपनीविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डिजिटल वॉलेटच्या माध्यमातून लोकांना मोठ्या परताव्याचे अमिश दाखवून ऑनलाईन स्वरूपात मोठी गुंतवणूक कंपनीचा संचालक सोमनाथ राऊत व त्याच्या सहकार्यांनी केली होती.थोडे दिवस परतावा रक्कम परत देऊन गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करून मोठ्या रक्कमेचा परतावा देण्याच्या अमिश दाखवून अधिक गुंतवणूक करून घेतली होती.मुख्य आरोपी सोमनाथ राऊत, आरोपी सोनिया राऊत हे मोठी रक्कम हडप करून फरार झाले होते. इतर आरोपींनी कंपनीतील कागदपत्रे नष्ट करणे, पैसे आरोपी यांनी स्वतःच्या खात्यावर ठेवून लपविणे, ते असे वेगवेगळ्या पद्धतीने गंभीर गुन्हा केले होते.

फिर्यादी सतीश खोडवे (रा कागल, जि. कोल्हापूर) यांनी साधारण 1200 पानांचे पुरावे, कॉल रेकॉर्डिंग, जाहिरात पुरावे, बँक खाते उतारे, संगतमत केलेले पुरावे, खोटी कागदपत्रे तयार केलेले पुरावे, करार, पावती, पत्रव्यवहार इत्यादी पुरावे पोलीस तपासात जमा केले आहेत. आरोपी वंदना पालवे ही कंपनीच्या सीईओ पदावर मागील 5 ते 6 वर्षे काम करत होती.आरोपी पालवे हिचे वडील व भाऊ यांनी कोर्टाच्या आवारात मुख्य फिर्यादी सतीश खोडवे यांना धक्काबुकी करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरकणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद दाखल केला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com