भूमिपुजनाच्या दिवशी निळवंडे अंत्य कालव्याच्या कामात अडथळा

भूमिपुजनाच्या दिवशी निळवंडे अंत्य कालव्याच्या कामात अडथळा
File Photo

पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal

उत्तर नगर जिल्ह्यातील जिरायती टापूला वरदान ठरणार्‍या निळवंडेच्या अंत्य कालव्यांचे पिंपरी निर्मळ शिवारात खा. सदाशिव लोंखडे यांच्या उपस्थितीमध्ये भूमिपूजन झाले.

मात्र या कार्यक्रमाच्या ठिकाणी पोकलेन व यंत्र सामुग्री जाण्यासाठी दोघांनी गाडी आडवी लावून अडथळा आणला. याप्रकरणी दोघांच्या विरोधात लोणी पोलीस स्टेशन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

निळवंडे लाभक्षेत्रातील शेतकरी गेल्या पन्नास वर्षांपासून धरणाच्या पाण्याची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. कालव्यांचे काम प्रगतिपथावर आहे. पिंपरी निर्मळपासून निळवंडेच्या अंत्य कालवा सुरू होतो. या कालव्याची निविदा प्रसिध्द होऊन वर्क ऑर्डर झाली आहे.

खा. सदाशिव लोंखडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पिंपरी निर्मळ शिवारात अंत्य कालव्याच्या भूमिपुजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. खा. लोखंडेसह निळवंडे पाटपाणी कृती समितीचे अध्यक्ष नानासाहेब शेळके, सचिव उत्तमराव घोरपडे, जिल्हा काँग्रेसचे सचिव श्रीकांत मापारी आदी मान्यवर यावेळी हजर होते.

मात्र काही लोकांनी कंत्राटदाराची पोकलेन व यंत्रसामुग्री भूमिपुजनाच्या ठिकाणी येण्यास गाडी आडवी लावून अडथळा आणला. खा. लोखंडे यांनी पोलिसांना याबाबत सूचना केल्यानंतर आडवी वाहने बाजुला करून यंत्रसामुग्री भूमिपुजनाच्या ठिकाणी आणण्यात आली व भूमिपूजन संपन्न झाले. लोणी पोलिसांनी एमएस कन्स्ट्रक्शन कंपनी प्रा. लि. यांचे साईट इन्चार्ज श्रावण तुपे यांच्या फिर्यादीवरून संदीप शंकर गाढे, रा. वाकडी, करण दिपक माघाडे, रा. लोणी यांच्या विरोधात कलम 341 अन्वये कामात अडथळे आणल्या प्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत.

एका दिवसात दोनदा भूमिपूजन

निळवंडेच्या अंत्य कालव्याचे एका दिवसात दोन कृती समित्यांकडून दोनदा भूमिपूजन झाले. सकाळी ज्ञानेश्वर वर्पे अध्यक्ष असलेल्या कृती समितीने आपल्या कार्यकर्त्यांसह पहिल्या कंत्राटदाराच्या यत्रंणेसह भूमिपूजन केले तर दुपारी नानासाहेब शेळके अध्यक्ष असलेल्या समितीने खा. सदाशिव लोखंडे यांच्या उपस्थितीमध्ये दुसर्‍या कंत्राटदाराच्या यंत्रणेसह भूमिपूजन केले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com