भूदान चळवळीत मिळालेल्या जमिनीची नियमबाह्य विक्री होतेय का ?

ज्येेष्ठ सर्वोदय कार्यकर्ते देवराम अंभोरे यांनी व्यक्त केली शंका!
भूदान चळवळीत मिळालेल्या जमिनीची नियमबाह्य विक्री होतेय का ?

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीत मिळालेल्या जमिनीची नियमबाह्य विक्री करण्यात येत आहे. त्यावर अस्तगाव येथील सर्वोदय कार्यकर्ते देवराम अंभोरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

विनोबाजींचे शिष्य असलेले सर्वोदय कार्यकर्त्ये देवराम अंभोरे हे भुदान चळवळीत सक्रीय होते. आता ते 89 वर्षांचे आहेत. त्या काळातील भुदान समिती होती ती आता राहिली नाही, हे ही त्यांना माहित नाही. भुदान चळवळीत मिळालेल्या जमिनींची बेकायदा विक्री होत असल्याबाबत त्यांच्याकडे तक्रारी आल्या होत्या. त्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, तेलंगणा भागात मोठे सावकार जमिनदार होते. सरंजामशाही होती. त्यांच्या विरुध्द शेतकरी, शेतमजुर यांचे हिंसात्मक आंदोलन सुरु केले.

मोठी हिंसा मारामार्‍या होवु लागल्या. दहशत निर्माण झाल्याने भारत सरकारने त्या काळात मिलिट्रीला पाचारण केले होते. अशा हिंसक वातावरणात विनोबाजी आपल्या वर्ध्यातील पवनार येथील आश्रम सोडून तेलंगण भागात गेले. त्यांनी तेथे पोचमपल्ली गावात मोठी सभा घेतली. 16 भूमिहिन हरिजनांनी जमिनीची मागणी केली. ती मागणी विनोबांनी जाहीर सभेत मांडली. त्यावेळी रामचंद्र रेड्डी या वकिलांनी जमिनीचे दान प्रथम दिले. त्या काळात देशात 5 कोटी लोक भुमिहीन होते.

विनोबाजी प्रत्येक सभेत शेतजमिनीची मागणी करु लागले. या भुदान आंदोलनाचे पडसाद त्या काळी 1952 मध्ये उमटले. नगर जिल्ह्यात बाळुभाई मेहता, विमलाताई ठकार, दादा धर्माधिकारी अदिंच्या भुदान आंदोलनाच्या सभा झाल्या. काही लोकांनी जमिनी दिल्या. विनोबांना अहिंसक मार्गाने जमिनी मिळु लागल्या. देशात त्यांना 45 लाख एकर जमिनी मिळाल्या. नगर जिल्ह्यात 2.5 हजार एकर क्षेत्र भुदान चळवळीत मिळाले. राष्ट्र सेवा दलाचे भुदान पथक, स्वामी सहजानंद भारती, जळगावचे काबरा, यांचे दौरे झाले. त्यातुन अडीचशे एकर जमिनीचे दानपत्र मिळाले.

जमिनीचे वितरण गावातील भुमिहिनांना काही अटी शर्ती घालून करण्यासाठी महाराष्ट्र भुदान समिती भाऊ धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाली होती.आता पहिली भुदान समिती राहिली नाही. नवीन भुदान समिती स्थापन आहे की नाही? काहीही समजण्यास मार्ग नाही. मात्र या जमिनींची नियमबाह्य विक्री केली जात असल्याच्या तक्रारी आहेत. अशी शंकाही देवराम अंभोरे यांनी व्यक्त केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com