भोकरला विहिरीत पोहतांना युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू
सार्वमत

भोकरला विहिरीत पोहतांना युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू

सहा तासांच्या अथक प्रयत्नानंतरही मृतदेह शोधण्यास अपयश

Arvind Arkhade

भोकर|वार्ताहर|Bhokar

श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथे विहिरीत पोहायला गेलेला केशव बाळासाहेब चव्हाण (वय- 23) या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना काल घडली, विहिरीत जास्त पाणी असल्याने जलतरणपटूंसह अनेकांनी सुमारे सहा तासांचे अथक प्रयत्न करूनही रात्री उशीरापर्यंत करूनही मृतदेह न निघाल्याने अखेर आज सकाळी पुन्हा प्रयत्न केले जाणार आहेत.

भोकर शिवारातील वडजाई परीसरात येथील सुनील भास्कर फासाटे यांच्या गट नं.84 मध्ये असलेल्या विहिरीत पोहण्यासाठी स्वत: सुनील फासाटे, त्यांचा मुलगा गौरव व मयत केशव हे तिघेही काल गुरूवार दि. 6 ऑगष्टच्या दुपारी दोन वाजेच्या सुमारास फासाटे यांच्या विहिरीत नेहमीप्रमाणे पोहण्यासाठी गेले होते.

सुनील फासाटे यांच्या सांगण्यानुसार त्याचा मुलगा गौरव व मयंक केशव हे दोघेही पोहणारे होते. काल दुपारी केशव व त्याचे वडील बाळासाहेब हे दोघेही याच विहिरीत पोहले होते. परंतु काल केशव याचे आई व वडील दोघेही नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले होते.

त्यामुळे केशव हा आमच्यासोबत पोहण्यासाठी आला, माझा मुलगा गौरव आणि केशव हे दोघेही काहीवेळ याच विहिरीत पोहले होते. त्यावेळी सुनील हे विहिरीजवळच बसून होते. नंतर काहीवेळाने या दोघा मुलांनी विहिरीच्या कठड्यावरून विहिरीत एकापाठोपाठ उड्या मारल्या. उडी मारल्यानंतर केशव बराच वेेळापर्यंत बाहेर आला नसल्याचे प्रत्यक्षदर्शी सुनील फासाटे यांनी सांगितले.

नंतर सुनील फासाटे यांनी ओरडा करत शेजारच्या शेतकर्‍यांना मदतीसाठी बोलावले. या युवकाला पाण्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले परंतु उपयोग झाला नाही. ही बातमी श्रीरामपूरचे उपविभागीय अधिकारी अनिल पवार व तहसीलदार प्रशांत पाटील यांना समजताच त्यांनी प्रशासकीय पातळीवर मदत केली व रात्री उशीरापर्यंत परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.

विहीर तुडूंब पाण्याने भरलेली असल्याने अनेकांचे अनेक प्रयत्न विफल होत होते. कारण या विहिरीची खोली सत्तर फुटाची असून विहिरीत जमिनी बरोबर पाणी असल्याने ते शक्य नव्हे. या केशवचा शोध घेण्यासाठी टाकळीभान येथील जलतरणपटू रावसाहेब बनकर, श्रीरामपूर येथील जलतरणपटू मोहन कुकरेजा व रामेश्वर शेळके हे ही दाखल झाले परंतु त्यांचेही प्रयत्न असफल झाले.

याच दरम्यान या विहिरीतील पाणी पातळी कमी करण्यासाठी जवळ वीजपुरवठ्याची सोय नसल्याने श्रीरामपूर नगर परिषदेची अग्नीशामक बोलविण्यात आली परंतु अरूंद रस्ता व रस्त्याच्या कडेची वाढलेली झाडे व आडव्या झाडांच्या फांद्यांमुळेही अग्नीशामकला अर्ध्या रस्त्यातून मागे परतावे लागले.

यावेळी कामगार तलाठी ज्ञानेश्वर हाडोळे, पोलीस हेड कॉ. रवीद्र पवार, पोलीस मित्र बाबा सय्यद, पोलीस पाटील बाबासाहेब साळवे आदींसह गावातील अशोकचे संचालक पुंजाहरी शिंदे, काँग्रेस सेवा दलाचे तालुकाध्यक्ष सुदामराव पटारे, बाळासाहेब बेरड, भाऊसाहेब चव्हाण आदींसह मोठा जमाव रात्री उशीरापर्यंत दुर्घटना स्थळी ठाण मांडून होते.

अखेर रात्री उशीरा अंधार वाढल्यानंतर जवळपास वीज नसल्याने सर्वांनी प्रयत्न थांबविण्याचा निर्णय घेत आज सकाळपासून या युवकाला शोधण्यासाठीचे प्रयत्न केले जाणार आहे.

मयत केशव हा बाळासाहेब शिवराम चव्हाण यांचा एकुलता एक मुलगा आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, दोन विवाहीत मुली व एक अविवाहीत मुलगी असा परिवार आहे. दुर्दैवाने बाळासाहेब चव्हाण यांचा एक मुलगा यापूर्वी लहान असताना एका शेतकर्‍याचा पाण्याच्या टाकीत पडून पाण्यात बुडून मयत झालेला असल्याने या चव्हाण कुटुंबीयांवर अशा प्रकारचा हा दुसरा आघात आहे. तर केशव या युवकास पोहता येत असताना त्याचा तो पाण्यात बुडाला कसा याबाबत तर्कवितर्क लावले जात होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com