
भोकर |वार्ताहर| Bhokar
श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील गावतळ्यातील पाणी साठा कमी झाल्याने तसेच माजी उपसरपंचांच्या विहीरीचे पाणी घटल्याने भोकर येथील नळपाणी पुरवठा योजनेला तीन दिवसाआड पाणी पुरवठा सुरू झाला आहे. त्यामुळे गावास तीव्र पाणीटंचाई भासत आहे. गेल्या पाच दिवसापासून येथील चारी क्रं.15 ला पाणी वाहत असतानाही केवळ पुढचे भरणे चालु असल्याचा नियम दाखवून ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वेठीस धरले जात आहे. गावतळ्यात तातडीने पाणी सोडून पाणीटंचाई दुर करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
येथील गावतळ्यात केवळ मृतसाठा शिल्लक आहे. भोकर गावास पाणी पुरवठा करण्यासाठी गावालगत असलेल्या बारवेचे पाणी दुषीत झाल्यापासून गावची पिण्याच्या पाण्याची हेळसांड सुरू आहे. त्यावर काही काळासाठी अशोकचे माजी संचालक खंडेराव पटारे यांचे विहीरीतून गावास पाणी पुरवठा करण्यात आला. त्यानंतर आता माजी उपसरपंच महेश पटारे यांच्या विहीरीचे पाणी गावास पिण्यासाठी सुरू होते.
परंतू पटारे यांच्या विहीरीची पाणी पातळी खालवल्याने गावास तीव्र पाणीटंचाईस तोंड द्यावे लागत आहे. गावात तीन दिवसाआड नळाला पाणी येत आहे. त्यातच अनेक ठिकाणी अनाधिकृत व अधिकृत कनेक्शन असल्याने येणारे पाणीही पुर्ण दाबाने मिळत नाही. त्यामुळे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तर दुसरीकडे सधन कुटूंब मात्र जारचे पाणी पिण्यासाठी घेत असले तरी वापरासाठी पाणी टंचाईच आहे. आजपर्यतच्या इतिहसात इतक्या मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई कधीच झाली नसल्याने ग्रामस्थांत नाराजीचा सुर दिसत आहे.
गेल्या काही महिन्यापूर्वी गावतळ्यालगत खोदलेल्या कुपनलीकेची अवस्था स्मशान भुमीलगत खोदलेल्या नवीन विहीरीप्रमाणे झाल्याने या दोनही योजना निरुपयोगी ठरल्याचे दिसत आहे. या विहीरीची खोदाई झाली, कठडे बांधले, विज पुरवठाही आला, पुर्ण वर्ष होत आले परंतू विजपंप न टाकल्याने या विहीरीच्या पाण्याबाबत काहीही सांगणे शक्य नाही. ही विहीर खोदूनही काहीच उपयोग झाल्याचे दिसत नाही. येथून जवळच खोदलेली कुपनलीकाही काही दिवसात बंद पडल्याचे कर्मचारी सांगत आहेत.
गावतळ्यात पाणी पुरवठा करणारी चारी क्र.15 पाच दिवसांपासून वाहत आहे. या चारीच्या गावतळ्यातील फाट्यापासून खालील घुमनदेवपर्यंतचे शेतीचे भरणे होईपर्यंत गावास पाणी देता येणार नाही, पाटबंधारेच्या नियमानुसार टेल टू हेड असा नियम असल्याने कालवा निरीक्षक नियम बाजुला ठेवून काम करण्यास तयार नाही. त्यामुळे चारी वाहत असतानाही गावास पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे. वरिष्ठांनी लक्ष यात घालून तातडीने गावतळ्यात पाणी सोडून पाणी टंचाई दुर करावी, अशी मागणी ग्रामस्थानी केली आहे.