
भोकर |वार्ताहर| Bhokar
श्रीरामपूर तालुक्यातील भोकर परीसरात राज्य मार्गालगत झालेल्या नवीन महानुभव आश्रमातून देवाच्या दागिन्यांसह संसारोपयोगी साहित्याची चोरी झाली तर वडजाई शिवारातील एका शेतकर्यांचा पाणबुडी वीजपंप व केबलची चोरी झाली. गावात काही दिवसांपासून मध्यरात्रीच्या सुमारास काही पल्सर गाड्यांचा फेरफटका होत असल्याची चर्चा आहे. चोर्यांचे प्रमाण वाढल्याने तालुका पोलिसांनी रात्रीची गस्त सुरू करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
श्रीरामपूर-नेवासा राज्य मार्गापासून काही अंतरावर गट नं. 223 मधील ओथंबा महानुभव मठ येथे चोरी झाली. मठातील जितेंद्र देमेराजबाबा कपाटे हे बाहेरगावी गेले होते. त्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी मठातील शिलाई मशीन, मशीनची इलेक्ट्रीक मोटार, मिक्सर, गॅस सिलेंडर, टेबल फॅन, इस्त्री, देवाचा सोन्याचा टिळा व रोकड अडीच हजार रुपये असा मिळून सुमारे 25 हजारांचा ऐवज लंपास केला.
यापुर्वी गेल्या वर्षी या मठाचे बांधकाम सुरू असताना बाबा बाहेरगावी गेल्यानंतर बांधधकामासाठी आणलेले वेल्डींग मशीन, ड्रील मशीन, ग्रँडर कटर, वायरींग, लोखंडी टुलकिट असा सुमारे विस हजारांचा ऐवज चोरी झाला होता. संबंधितांनी त्यावेळी पोलिसांत तक्रार दाखल केली नव्हती. परंतु आता दुसर्यांदा चोरी झाल्याने तालुका पोलिसांत कलम 454, 457, 380 प्रमाणे फिर्याद दाखल केली असून पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र पवार हे तपास करीत आहेत.
दुसरीकडे वडजाई शिवारात प्रहार संघटेनेचे नानासाहेब लक्ष्मण तागड यांच्या गट नं.135 मधील शेतातील विहिरीतील पाणबुडी वीजपंप व साठ फूट केबल अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची फिर्याद तागड यांनी दिली. त्यावरुन भादंवि कलम 379 प्रमाणे अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल केला असून याचा तपासही रवींद्र पवार करीत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून भोकर परिसरात मध्यरात्री काही पल्सर दुचाकीवर अनोळखी व्यक्ती गावात फेरफटका मारताना दिसत असल्याची चर्चा असल्याने नागरिक जागरूक राहून दक्षता घेत आहेत, असे असले तरी तालुका पोलिसांनी रात्रीची गस्त सुरू करावी, अशी मागणी एकलव्य आदिवासी संघटनेचे राजेंद्र लोखंडे व प्रहार संघटनेचे तालुका कार्याध्यक्ष नानासाहेब तागड यांनी केली आहे.