मध्यरात्री भोकर परिसरात रस्त्यात महिलेची प्रसुती झाली

करोनाच्या काळात भोकरच्या परिचारीकेने वाचविले माता व बालिकेचे प्राण
मध्यरात्री भोकर परिसरात रस्त्यात महिलेची प्रसुती झाली

भोकर |वार्ताहर| Bhokar

एका अनोळखी गरोदर स्त्रीला मदत करायची म्हणजे जीवावर उदार होण्यापेक्षा कमी नव्हते. मध्यरात्रीच्या सुमारास राज्यमार्गावर क्रुझर गाडीत असलेल्या

एका गरोदार महिलेस जास्त त्रास होऊ लागला. मात्र प्रसुतीची वेळ झाल्याने पूर्ण साहस करत भोकर येथील परिचारीका सुशिला बेल्हेकर यांनी रात्री साडे अकराच्या सुमारास पहिले सिझर झालेल्या स्त्रीची नॉर्मल प्रसुती करत त्या मातेचे व तिला प्राप्त झालेल्या कन्येचे प्राण वाचविले. त्याबद्दल बेल्हेकर यांचे सर्वत्र कौतुक होत असून करोनाच्या काळात परीचारीकेने मातेसह बालिकेचे प्राण वाचविल्याने समाधान व्यक्त होत आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील आरोग्य उपकेंद्रातील परीचारीका सुशिला बेल्हेकर या दिवसभराचे लसीकरण व नित्याचे घरकाम आटोपून निद्रीस्त झालेल्या असताना रात्री साडे अकराच्या दरम्यान मोबाईल आला की, एका क्रुझर गाडीत गरोदर स्त्री आहे, तिला फार त्रास होतोय, प्लीज येताय का? असे विचारले.

परिचारीका सुशिला बेल्हेकर चौतीस वर्षांपासून सेवा करत असल्याने त्यांना राहवले नाही, त्यांनी लागलीच ‘तुमची गाडी घेऊन या, मी तुमच्याबरोबर येते, असे सांगितले. काही वेळात आवश्यक साहित्य सोबत घेऊन बेल्हेकर सिस्टर पोहचल्या. श्रीरामपूर-नेवासा रस्त्यावरील लोखंडेवस्तीजवळ एका क्रुझर गाडीत महिला प्रसुती वेदनांनी विव्हळत होती.

परंतु सध्याच्या करोनाच्या काळात त्यातही अनोळखी महिला! सोबत कुणीही महिला नाही, केवळ त्या महिलेचे पती, गाडी चालक व एक दोन वर्षाचे त्यांचे बालक. करोनामुळे मोठी रिस्क होती परंतु त्या महिलेचा व बाळाचा जीवही तेवढाच महत्त्वाचा होता.

त्यांनी अधिक चौकशी केली असता, ही महिला नेवासा शहरातील होती. या महिलेचे पहिले सिझर झालेले आहे, तिला लोणी येथील प्रवरा हॉस्पिटलची ट्रीटमेंट असल्याने आता डिलेव्हरीसाठी लोणी येथे नेण्याचा नातेवाईकांचा प्रयत्न होता. परंतु वेळ कमी असल्याने त्यांनी भोकर शिवारातील लोखंडेवस्तीचा आसरा घेत मदत मागितली. दैव बलवत्तर म्हणून रावसाहेब लोखंडे यांना बेल्हेकर सिस्टर आठवल्या आणि त्यांची मदत मिळाली.

सिस्टर सुशिला बेल्हेकर यांनी क्रुझरमध्येच त्या महिलेची डिलेव्हरी केली, तिही नॉर्मल. आणि सर्वांचाच जीव भांड्यात पडला, प्रसुती होऊन कन्या झाली. आजच्या मुलींच्या टंचाईच्या काळात आपण एक मुलगी वाचविल्याचा आनंद सर्वांच्याच चेहर्‍यावर दिसत होता. बेल्हेकर यांनी त्या महिलेचे पहिले सिझर झालेले असल्याने रक्त प्रवाह बंद करण्यासाठी हॉस्पिटलची गरज असल्याचे सांगीतले. रात्रीच सिस्टर बेल्हेकर यांनी नवजात बालिकेला व तिच्या मातेला साखर कामगार हॉस्पिटलला पोहचविलेे. तेथील सोपस्कर आटोपून परीचारीका बेल्हेकर क्रुझर चालकासोबत पहाटे अडीच वाजता भोकर येथे पोहचल्या.

भोकरच्या उपकेंद्रात वैद्यकीय अधिकारी द्या; ग्रामस्थांची मागणी

तत्कालीन आ. स्व. जयंतराव ससाणे व तत्कालीन जिल्हा परीषद अध्यक्षा शालिनीताई विखे पा. यांच्या प्रयत्नातून साकारलेल्या भोकर येथील आरोग्य उपकेंद्रात करोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान डॉ. अनुराधा अनाप-शिंदे या नागरीकांच्या सेवेसाठी सतत हजर होत्या; परंतु दोन महिन्यापुर्वी त्यांची बदली झाल्याने येथील वैद्यकीय अधिकार्‍याचे पद रिक्त आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी कुचंबना होत आहे. गावच्या लोकसंख्येचा विचार करता येथे लवकरात लवकर पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी द्यावा, अशी मागणी होत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com