भोकर परिसरातील रस्त्याची दुरावस्था

रस्ते दुरूस्तीची शेतकरी व कष्टकर्‍यांची मागणी
भोकर परिसरातील रस्त्याची दुरावस्था

भोकर |वार्ताहर| Bhokar

श्रीरामपूर तालुक्यातील भोकर शिवारातील वाड्यावस्त्यावरील रस्त्यांची सध्या सुरू असलेल्या पावसाने मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाल्याने परीसरातील जगतापवस्ती व वडजाई शिवारातील दुध उत्पादक, शेतकरी, शाळकरी मुलांबरोबरच महाविद्यालयीन मुलामुलींनाही मोठ्या प्रमाणात मनस्ताप होत असल्याने या रस्त्याची त्वरीत दुरूस्ती करावी, अशी मागणी परीसरातील शेतकर्‍यांकडून केली जात आहे.

भोकर - घुमनदेव रोडलगत जगतापवस्तीहुन अडबंगनाथ देवस्थानकडे जाणार्‍या रस्त्याची दररोजच्या झिमझिम पावसाने अतिशय दुरावस्था झाली आहे. या परीसरातील शेळकेवस्ती, मते वस्ती, जगतापवस्ती, बनकरवस्ती, काळेवस्ती आदि वस्त्यांवर राहणारे दुध उत्पादक, शेतकरी, शाळकरी मुले, मुली, महाविद्यालयीन विद्यार्थी यांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप होत आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने या खड्ड्यात पाणी साठून मोठ्या प्रमाणात गाळ होत आहे. अशा निसटत्या ठिकाणाहुन दुचाकी व सायकल चालक व शाळकरी मुलांना अपघात होवून दुखापत झालेली असल्याने या रस्त्यावर मुरूम व खडी टाकून त्वरीत दुरूस्ती करावी.

तसेच भोकर स्टँडपासून वडजाईकडे जाणार्‍या भोकर-कारेगाव रोडचीही मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. या मार्गावर जगदंबा युवा प्रतिष्ठानचे संस्थापक गणेश छल्लारे यांनी काही प्रमाणात मुरूम टाकला परंतू खड्ड्यांचे आणी गाळाचे प्रमाण मोठे असल्याने तो मुरूम तेथे कमी पडला आहे. पर्यायाने वडजाई शिवारातील खंडागळेवस्ती, चव्हाणवस्ती, पटारेवस्ती, वाकडे वस्ती, शिंदेवस्ती, बेरडवस्ती, मतेवस्ती, गाढेवस्ती, वडजाईवस्तीशाळा या परीसराकडे जाणारा हा प्रमुख मार्ग खराब झाल्याने या परीसरातील शेतकरी, दुग्धव्यासायीक, शाळकरी मुले, मुली, महाविद्यालयीन मुले मुली यांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे.

या रस्त्यांची त्वरीत डागडूजी करून या परिसरातील रस्ते त्वरीत दुरूस्ती करावी अशी मागणी परिसरातील शेतकरी व कष्टकरी नागरिकांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com