भोकरला गिन्नी गवताच्या शेतात मृतावस्थेतील बिबट्या आढळला

बिबट्या (File Photo)
बिबट्या (File Photo)

भोकर |वार्ताहर| Bhokar

श्रीरामपूर तालुक्यातील भोकर शिवारातील वडजाई परिसरात एका शेतकर्‍याच्या गीन्नी गवतात मृत अवस्थेत बिबट्या आढळून आला आहे. काल वन विभागाने मृत बिबट्यास ताब्यात घेतले असून त्याच्यावर उद्या शवविच्छेदन केले जाणार आहे. शवविच्छेदनानंतर या बिबट्याचा मृत्यू कशामुळे झाला याची माहिती मिळणार आहे.

भोकर व खोकर परीसरात गेल्या काही वर्षांपासून बिबट्याचा, बिबट्याच्या मादीचा व बछड्यांचा वावर आहे. शेतात वस्ती करून राहत असलेल्या अनेक शेतकर्‍यांनी आपल्या वस्तीला तार कंपाउंड सारखे संरक्षण केल्याने परीसरातील शेळ्या, मेंढ्या खाण्याचे प्रमाण घटले आहे. त्यामुळे परीसरातील कुत्र्यांची संख्या अतिशय नगण्य झाली आहे. संरक्षीत वनविभागाप्रमाणे या परीसरातही शेतकर्‍यांना बिबट्या, बिबट्याची मादी तर बछड्यांसह मादी यांचे दर्शन नित्याचेच झालेले आहे. त्यामुळे हा परीसर तसा बिबट प्रवणक्षेत्र झाला आहे.

भोकर शिवारातील भोकर-कारेगाव रोडपासून काही अंतरावर शेती असलेल्या शांताबाई संपतराव पटारे यांचे गीन्नी गवतात गेल्या दोन दिवसांपासून सडलेल्या मांसाचा वास येत होता. परंतु या भागात बिबट्या बरोबरच रानडूकरांचाही मोठ्या प्रमाणात प्र्रादूर्भाव असल्याने कुठलाही प्राणी मृत झाला असू शकतो असा संशय या शेतकर्‍यांना होता. त्यातच परीसरात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे तिकडे जाणे शक्य नव्हते.

काल सायंकाळी येथील सोसायटीचे माजी उपाध्यक्ष कचरू पटारे हे गायीसाठी गीन्नीगवत आणण्यासाठी गेले असता ते मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटल्याने त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता त्याची बोबडीच वळली; कारण समोर मृतावस्थेतील पण बिबट्या होता. लागलीच घर गाठत हा प्रकार सांगितला. येथील पोलीस पाटील बाबासाहेब साळवे व पत्रकार चंद्रकांत झुरंगे यांनी लागलीच घटनास्थळी भेट देत प्रत्यक्ष पाहणी करून वनसंरक्षक भाऊसाहेब गाढे, मदतनीस सूर्यकांत लांडे यांचेसह विभागीय वनसंरक्षक प्रतिभाताई पाटील व जिल्हा व संरक्षक सुवर्णा झोलमाने यांचेशी संपर्क केला.

यावेळी संजीवनी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष भागवतराव पटारे, संपतराव पटारे, नामदेव पटारे, सत्यम पटारे, ऋषीकेश झिने आदी उपस्थित होते. रात्री उशीराने हा प्रकार उघडकीस आल्याने रात्रीच्यावेळी शवविच्छेदन शक्य नाही.त्यामुळे या बिबट्याचे आज शवविच्छेदन व पुढील कारवाई होणार असल्याचे वनसंरक्षक भाऊसाहेब गाढे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com