भोकर व खोकर शिवारात वादळी वार्‍यासह अवकाळी पावसाची हजेरी

शिल्लक ऊस, शेतातील कांदा व उन्हाळी सोयाबीनसह आंबा अडचणीत
भोकर व खोकर शिवारात वादळी वार्‍यासह अवकाळी पावसाची हजेरी

भोकर |वार्ताहर| Bhokar

श्रीरामपूर तालुक्याच्या पूर्व भागातील भोकर व खोकर शिवारात काल रात्री वादळी वार्‍यासह अवकाळी पाऊस झाल्याने अनेक शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसत आहे. काही शेतकर्‍यांचा कांदा शेतातच आहे, परीसरातील अनेक शेतकर्‍यांच्या तोडणीला आलेल्या शिल्लक उसाने शेतकर्‍यांच्या चिंतेत भर पडल्याचे दिसत आहे. तर उन्हाळी सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत सापडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. वादळामुळे वीजपुरवठाही खंडित झाला होता.

भोकर शिवारात चार दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. उकाडा वाढलेला होता. काल गुरूवार दि. 19 मेच्या रात्री आठ वाजेच्या सुमारास सोसाट्याच्या वार्‍यासह पाऊस सुरू झाला. या पावसाने परीसरातील शेतकर्‍यांची एकच धांदल उडाल्याचे चित्र दिसले. ज्या शेतकर्‍यांकडे कांदाचाळी नाहीत ते प्लास्टीक कागदाच्या शोधात होते तर तुरळक प्रमाणात शेतात पडलेल्या कांदा उत्पादक शेतकरी मात्र चिंताग्रस्त झाल्याचे दिसले.

परिसरात मोठ्या प्रमाणात तोडणीला आलेला ऊस शिल्लक आहे. अशोक कारखान्याकडून केन हार्वेस्टरच्या साहाय्याने ऊस तोडणीसाठी रात्रंदिवस प्रयत्न सुरू आहे, अशोकचे संचालक पुंजाहरी शिंदे व ज्ञानेश्वर काळे हे त्यावर लक्ष ठेवून आहेत. आहे त्या मशीनद्वारे व उपलब्ध ऊस तोडणी मजुरांद्वारे लवकरात लवकर ऊस तोडणी करण्याचा ते प्रयत्न करत असतानाच या अवकाळी पावसाने शिल्लक ऊस उत्पादक शेतकर्‍यांचे कंबरडे मोडण्याची भीती व्यक्त होताना दिसत आहे. जास्त पाऊस झाला तर तोडणीस उशीर झालेल्या उसाच्या शेतात हार्वेस्टींगला अडचणी निर्माण होणार असून पर्यायाने शेतीची मशागतही लांबणार आहे.

या पावसाने उन्हाळी सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्याचबरोबर या वादळाने आंब्याच्या कैर्‍या पडून आंब्याचेही नुकसान होणार आहे. या वादळादरम्यान खंडित झालेला वीजपुरवठा रात्री उशीरापर्यंत सुरळीत झालेला नव्हता. त्यामुळे पहिल्याच अवकाळी पावसाने उकाड्यात चंगलीच वाढ झाली होती. अवकाळी पावसाने शेतात पडलेला कांदा, तोडणीअभावी राहिलेला ऊस, उन्हाळी सोयाबीन व आंब्याचे नुकसान होणार असल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com