भोकर, खोकर शिवारात बिबट्याचा धुमाकूळ

भोकर, खोकर शिवारात बिबट्याचा धुमाकूळ

खोकरला जाळी खालून शेळी नेवून केली फस्त

भोकर |वार्ताहर| Bhokar

श्रीरामपूर तालुक्यातील भोकर व खोकर परीसरात बिबट्याने धुमाकुळ घातला असून परीसरातील शेतकरी हैराण झाले आहेत. भोकर शिवारातील शिंदेवस्ती परीसरात बिबट्याचा मुक्काम असून शेतकर्‍यांना घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. काल खोकर शिवारातील महेश पटारे यांची शेळी जाळीखालून ओढून नेवून फस्त केली असून या परीसरात पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी शेतकर्‍यांकडून केली जात आहे.

खोकर व भोकर शिवारातील शेतकर्‍यांना बिबट्याचे दर्शन नित्याचे झाले आहे. भोकर परीसरातील वडजाईवस्ती शिवारात वस्ती करून राहत असलेले काँग्रेस सेवा दलाचे तालुकाध्यक्ष सुदाम पटारे यांचे शेतात अचानक बिबट्याचे दर्शन झाल्याने धांदल उडाल्याने जीव धेवून पळताना ते कीरकोळ जखमी झाले. या परीसरात पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करावे, अशी मागणी गेल्या आठवड्यापासून केली जात आहे.

येथून काही अंतरावर गट नं. 145 मधील पशुवैद्यक डॉ. मच्छींद्र शिंदे, गट नं. 146 मधील जेष्ठ शेतकरी कारीारी शिंदे व गट नं.144 मधील सोसायटीचे अध्यक्ष सागर शिंदे यांना आठवड्यापासून रोज रात्री तर कधी दिवसा बिबट्याचे दर्शन होत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना रात्री घराबाहेर निघणे मुश्कील होवून बसले आहे. हे शेतकरी गेल्या आठवड्यापासून दररोजची रात्र जीव मुठीत धरून काढत आहेत.

खोकर शिवारातील आर्ट ऑफ लिव्हींगचे मार्गदर्शक महेश पटारे यांच्या घरासमारे जाळीच्या आत असलेल्या शेळीवर गुरूवारी मध्यरात्री बिबट्याने जाळी खालील जमीन उकरून जाळीत प्रवेश करत शेळी ओढून नेवून वस्तीपासून सुमारे एक हजार फुटावर लगतचे शेतकरी संदिप सिन्नरकर यांच्या ऊसाच्या शेतात नेवून फस्त केली.या ठिकाणी वनविभागाचे सुर्यकांत लांडे यांनी भेट देवून पंचनामा केला परंतू गेल्या अनेक दिवसांपासून परीसरातील शेतकरी बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजर्‍यांची मागणी करत असताना वनविभागाकडून या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने शेतकर्‍यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com