भोकरला छप्पराच्या जळितात 70 हजारांचे नुकसान

मध्यरात्री लागलेल्या आगीतून बर्डे कुटूंब बचावले
भोकरला छप्पराच्या जळितात 70 हजारांचे नुकसान

भोकर |वार्ताहर| Bhokar

श्रीरामपूर तालुक्यातील भोकर परिसरातील वडजाई शिवारातील आबासाहेब दत्तू बर्डे यांच्या छप्पराच्या घराला लागलेल्या आगीत संसारोपयोगी वस्तू जळाल्याने या कुटुंबाचे सुमारे सत्तर हजाराचे नुकसान झाले. हे कुटुंब घरात झोपलेले असताना मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली. परंतु सुदैवाने कुठलीही जीवीतहानी झाली नाही. मात्र या कुटुंबालाचे केवळ अंगावरील कपडे शिल्लक राहिले. आगीचे कारण समजू शकले नाही.

भोकर शिवारातील वडजाई परीसरात असलेल्या बारा खोंगळया तळ्याजवळ राहत असलेले आबासाहेब दत्तू बर्डे हे आपल्या कुटुंंबियांसह छप्पराच्या घरात झोपलेले असताना मध्यरात्रीच्या सुमारास अचानक छप्पराला आग लागली. परंतु त्यांना जाग आल्याने सर्व कुटूंबातील सदस्यांसह त्यांनी घराबाहेर पळ काढल्याने कुठलीही जीवीतहानी अथवा जखमी झाले नसले तरी या कुटुंबाच्या केवळ अंगावरील कपड्याशिवाय काहीच शिल्लक राहिले नाही. याठिकाणी केवळ घराच्या भिंती उभ्या आहेत.

या जळीतात बर्डे कुटुंबाच्या संसारोपयोगी वस्तूसह घरात असलेले तीन गोण्या धान्य, टिव्ही, कपाट, लाकडी वस्तू, छप्पराचे बांबू व पाचरटासह सर्व उपयोगी वस्तू जळाल्या. यात या कुटुंबाचे सत्तर हजाराच्या मालमत्तेचे नुकसान झाले. या दिवशी वीजपुरवठा खंडित असल्याने घरात दिवा लावलेला होता. वीजपुरवठा नसल्याने आग नेमकी कशामुळे लागली, हे समजू शकले नाही.

आगीची घटना समजताच कामगार तलाठी अशोक चितळकर यांनी तातडीने भेट देत पंचनामा केला. एकलव्य संघटनेचे युवा तालुका सचीव दीपक बर्डे, तालुका सचीव सर्जेराव आहेर, शाखाध्यक्ष बबन आहेर, उपाध्यक्ष राजू लोखंडे व बापू आहेर आदिंनी घटनास्थळी भेट देत बर्डे कुटुंबियांचे सांत्वन केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com