भोकरला नऊ दिवसांत सहा जणांचा मृत्यू

रुग्णांचे उपचारानंतर निधन तरी बाधितांच्या यादीत नाव नाही; संभ्रमावस्था
भोकरला नऊ दिवसांत सहा जणांचा मृत्यू

भोकर |वार्ताहर| bhokar

श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथे करोनाचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांत चिंता व्यक्त होत असून येथे प्रशासनाने विशेष लक्ष घालण्याची गरज असल्याचे दिसत आहे. करोनाच्या दुसर्‍या लाटेचा चांगलाच दुष्परीणाम जाणवत आहे, येथे आतापर्यंत सात जणांचे निधन झाले आहे. पैकी चौघांचा करोनाने निधन झाल्याचे दिसत आहे तर तिघांच्या निधनाचे कारण समजू शकले नाही, दुसर्‍या लाटेतील बाधितांच्या संख्येने चाळीसी पार केली आहे.

भोकर परीसरात करोनाच्या दुसर्‍या लाटेचे दुष्परीणाम मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. शासनस्तरावर सर्वतोपरी प्रयत्न होत असले तरी कुठेतरी कमी असल्यामुळे प्रादुर्भाव वाढत आहे. येथे दुसर्‍या लाटेच्या पहील्या टप्प्यात म्हणजे मार्च मध्ये पहिला मृत्यू झाला, त्यांचेवर अहमदनगर येथे अंत्यसंस्कार झाले. त्यानंतर एप्रील मध्ये सहा जणांचे निधन झाले, त्यात एक महिला व पाच पुरूष आहेत. त्यातील तिघांचे निधन हे गावीच झाल्याने त्यांचेवर गावातच अंत्यसंस्कार झाले तर दोघांवर अहमदनगर येथे उपचार सुरू होते त्यांचे तीथेच निधन झाल्याने त्यांचेवरही अहमदनगर येथे अंत्यसंस्कार झाले तर एकाचे श्रीरामपूर येथे उपचारादरम्यान निधन झाल्याने त्यांचेवर श्रीरामपूर येथेच अंत्यसंस्कार झाले.

येथे दुसर्‍या लाटेत आतार्यंत चाळीस पेक्षा जास्त व्यक्ती बाधित झाले आहेत, त्यातील काहींवर अद्याप उपचार सुरू आहेत तर काहींचे उपचार होऊन ते होमक्वारन्टाईन आहेत. परंतु खेदाची बाब म्हणजे येथे दोन दिवसांत तिघांचे निधन झाले आहे, त्यात दोघांवर अहमदनगर येथे अंत्यसंस्कार झाले तर एकावर श्रीरामपूर येथे अंत्यसंस्कार झाले. पैकी दोघांचे काल निधन झाल्याने परीसरात चिंता वाढल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता येथे प्रशासनाने गाभीर्याने लक्ष घालण्याची गरज असल्याचे मत अनेकांकडून व्यक्त होताना दिसत आहे.

आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभामुळे स्थानिक करोना कमिटी अनभिज्ञच

करोनाची दुसरी लाट सुरू झाल्यानंतर मार्चमध्ये एकाचे निधन झाले, ते करोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल त्यांच्या मृत्यूनंतर 21 व्या दिवशी आल्याचे सर्वश्रूत आहे. याबाबत दै. सार्वमतमध्ये वृत्त प्रसिद्ध होऊनही त्यात कुठलीच सुधारणा झाल्याचे दिसत नाही. येथील काल निधन झालेल्या दोघांपैकी एकजण श्रीरामपूर येथील सरकारी रूग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले असले तरी ती व्यक्ती पॉझीटिव्ह असल्याचे स्थानिक वैद्यकीय विभागाला किंवा करोना कमेटीला कुठलीच माहिती नव्हती, तर दोन दिवसांपूर्वी एकाचे अहमदनगर येथे उपचारादरम्यान निधन झाले त्यांचेवर अहमदनगर येथे अंत्यसंस्कार झाले परंतु अद्यापर्यंत आरोग्य विभागच्या अ‍ॅक्टीव्ह रुग्णाच्या यादी नाव नसल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. तर एक जण गेल्या आठवड्यापासून लोणी येथे उपचार घेत आहे, ती व्यक्ती करोनाचेच उपचार घेत असल्याचे नातेवाईक सांगत आहेत पण आरोग्य विभागाच्या यादीत त्या व्यक्तीचेही नाव अ‍ॅक्टीव्ह रुग्णात नसल्याने स्थानिक आरोग्य विभागासह स्थानिक करोना कमेटीही अनभिज्ञच असल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली असल्याने यातही प्रशासनाने तातडीने लक्ष घालण्याची गरज असल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त होताना दिसत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com