भोकर येथे कृत्रीम पाणीटंचाई

पाण्याअभावी अनेकांनी केले शौचालय बंद || टेलटँकचे पाणी देण्याची ग्रामस्थांची मागणी
भोकर येथे कृत्रीम पाणीटंचाई

भोकर |वार्ताहर| Bhokar

श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथे गावतळ्यात पाणी असताना तसेच गावालगत चार विहिरी व एक बोअरवेल असताना पिण्याच्या पाण्याची कृत्रीम पाणी टंचाई सुरू आहे. तीन महिन्यांपासून दिवसाआड येणारे पाणी तुटपुंजे येत असल्याने महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ग्रामपंचायतीने टेलटँकहून येणार्‍या पाण्यातून गावाला दिवसाआड पण पुरेसे पाणी द्यावे, अशी मागणी महिलांकडून होत आहे. पाणी टंचाईमुळे पाण्याची बचत म्हणून अनेक कुटुंबांनी शौचालयाचा वापर कमी करून गावाबाहेर प्रात:विधी सुरू केल्याने इतरांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

भोकर गावास पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी ग्रामपंचायतीने आतापर्यंत अनेकदा केलेले प्रयत्न अपयशी ठरत आहेत. पुरातन काळची चौकोनी बारवेची दुरूस्ती करताना तत्कालीन पदाधिकार्‍यांनी दुर्लक्ष केल्याने विहिरीचे कठडे काँक्रिटने बांधताना खोदाई दरम्यान संबंधितांनी मुरूमाऐवजी गावतळ्यालगतची काळी माती भरली, त्यामुळे काही ठिकाणी लहान मोठे छिद्र राहिले, त्यात संबंधितांनी सिमेंटच्या रिकाम्या गोण्या दाबून ते छिद्र बंद केले. अशा एका छिद्रातील गोणी निसटून बाहेरची काळीमातीही बारवेत आली. त्या मातीबरोबर गावतळ्यातील दूषित पाणी बारवेत उतरले अन् पाणी टंचाई सुरू झाली.

ग्रामपंचायतीने गेल्यावर्षी तातडीने गावतळ्यालगत स्मशानभुमीपासून काही अंतरावर विहिरीची खोदाई केली, त्यावेळी काहींनी टेकडावर पाणी लागणार नाही, पाण्याचा झोक सखोल भागाकडे असतो, अशी सूचना केली होती. परंतु ग्रामपंचायातीच्या सल्लागारांनी त्याकडे दुर्लक्ष करण्यास भाग पाडले. विहीर खोदण्यापूर्वी शासनाच्या मार्गदर्शक सूचना असतानाही त्याकडे दुर्लक्ष झाले. प्रत्यक्षात विहीर खोदून वर्ष झाले असताना अद्याप विहिरीवर अधिकृत वीज कनेक्शन व वीजपंप नाही. त्यामुळे विहिरीचा आतापर्यंत काहीच उपयाोग झालेला नाही.

त्यानंतर ग्रामपंचायतीने गावतळ्यालगत तातडीने कूपनलीकेची खोदाई करून तेथे वीजपंप टाकला. परंतु त्या कुपनलीकेलाही पुरेसे पाणी उपलब्ध झाले नाही. दरम्यानच्या काळात एकलव्यच्या मार्गदर्शनाखाली महिलांच्या पाण्यासाठी आलेल्या मोर्चा दरम्यान उपसरपंच महेश पटारे यांनी स्वत:च्या विहिरीतून पाणी देण्याचे कबूल करत काही दिवस पणी दिले. परंतु आता उन्हाळा असल्याने शेती व गावचे पाणी भागविण्यास त्यांची विहीरही असमर्थ ठरत असल्याने ग्रामस्थांना पाणी टंचाईस तोंड द्यावे लागत आहे.

दरम्यानच्या काळात ग्रामस्थांनी गावातील बंद कुपनलीका दुरूस्त करून त्यातील पाण्याचा काही प्रमाणात आधार होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. परंतु दोन महिन्यांत ग्रामपंचयतीने कुपनलीका दुरूस्ती न केल्याने पाणी टंचाईत भर पडत आहे. सध्या अनेकजण अशोक कारखान्याचे माजी संचालक खंडेराव पटारे यांचे विहिरीचे पाणी वाहून नेताना दिसत आहे. पाणी टंचाईची झळ विशेषत: शेतमजूर कुटुंबांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. ग्रमपंचायतीचे मार्गदर्शक व अशोकचे संचालक पुंजाहरी शिंदे यांनी लक्ष घातल्याास तसेच टेलटँकहून येणार्‍या पाणी पुरवठ्यातून दिवसाआड पाणी दिल्यास काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो. ग्रामपंचायतीने वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन गावास पिण्याचे पाणी तातडीने उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

Related Stories

No stories found.