भिंगारच्या पोलीस ठाण्यात दोन अंमलदारांमध्ये राडा

घटनेला हप्तेखोरीचा वास || अनेक दिवसांची धुसफूस बाहेर
भिंगारच्या पोलीस ठाण्यात दोन अंमलदारांमध्ये राडा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यातील दोन पोलीस अंमलदारांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेली धुसफूस बुधवारी रात्री बाहेर पडली. पोलीस ठाण्यातील ठाणे अंमलदार कक्षातच दोघांमध्ये चांगलाच राडा झाला. ही घटना पोलीस ठाण्यातील सीसीटीव्हीमध्ये देखील कैद झाली आहे. हप्तेखोरीतून हा प्रकार झाल्याची चर्चा पोलीस दलात सुरू आहे.

भिंगार शहर, बुर्‍हाणनगर, दरेवाडी आदी भागाची जबाबदारी असलेले भिंगार कॅम्प पोलीस ठाणे नेहमीच चर्चेत असते. येथील अवैध धंदे खुलेआम सुरू आहेत. पोलीस ठाणे हद्दीतील हप्तेखोरीही चर्चेचा विषय ठरली आहे. याच कारणातून पोलीस अंमलदारांमध्ये नेहमी कुरघोडीचे राजकारण सुरू असते. पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांच्या मर्जीतील एका अंमलदारावर अनेकांचा डोळा आहे. त्याची हप्तेखोरी उघड करण्यासाठी प्रयत्न इतरांकडून सुरू आहेत. त्या अंमलदाराला इतरांकडून टार्गेट केले जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे. याला बुधवारी रात्री वेगळे वळण मिळाले.

पोलीस ठाणे हद्दीतील चोरीच्या गुन्ह्यातील दोन आरोपींची खबर पोलिसांना मिळाली होती. त्यांना अटक करण्यासाठी पथक रवाना करण्याच्या सूचना प्रभारी अधिकार्‍यांनी दिल्या. या पथकामध्ये जाणार्‍या प्रभारी अधिकार्‍यांच्या मर्जीतील अंमलदाराला दुसर्‍या एका अंमलदाराकडून अश्लिल भाषेचा वापर झाला. यातून हा वाद झाला. ते दोघे एकमेकांवर भिडले. तेथे उपस्थित असलेल्या अधिकारी, अंमलदारांनी मध्यस्थी करत हा वाद मिटविला.

दरम्यान सीसीटीव्ही कॅमेर्‍यात ही घटना कैद झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दोन अंमलदारांमधील खदखद हाणामारीतून बाहेर आल्याने याची चर्चा सर्वत्र झाली आहे. दरम्यान याची दखल पोलीस ठाणे प्रभारी अधिकार्‍यांनी घेतली आहे. घटना घडली त्या वेळचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून स्टेशन डायरीमध्ये नोंद केली आहे. हा प्रकार कशातून घडला याची चौकशी सुरू केली असून चौकशीअंती अहवाल वरिष्ठांना सादर केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

दोघांच्या वादाला तिसर्‍याकडून फोडणी

भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत अनेक अवैध धंदे सुरू आहेत. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले असले तरी छुप्या पध्दतीने हे धंदे सुरूच असल्याचे दिसून येत आहे. या अवैध धंद्यातून जमा होणारा मलिदा खाण्यासाठी अनेकजण प्रयत्न करत आहेत. याच कारणातून दोन अंमलदारांमध्ये वाद होऊन चांगलाच राडा झाला. या दोघांच्या वादाला तिसर्‍या एका अंमलदाराकडून फोडणी दिली जात आहे. तो अंमलदार दोघांच्या वादाची वाच्यता पोलीस दलात करीत आहेत. त्याच्यावरही वरिष्ठ अधिकार्‍यांनी कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com