भिंगारमध्ये हातभट्टीची खुलेआम विक्री

दारू पिल्याने अल्पवयीन मुलगा बेशुद्ध; पोलिसांचे दुर्लक्ष
भिंगारमध्ये हातभट्टीची खुलेआम विक्री
File Photo

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

भिंगार शहरात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या हातभट्टी दारू अड्डे सुरू असून मंगळवारी एक अल्पवयीन मुलगा हातभट्टी दारू पिल्यामुळे त्याची प्रकृती चिंताजनक झाली होती. त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. दरम्यान, हातभट्टी दारूची निर्मिती करून ती भिंगार शहरात खुलेआम विक्री केली जात असल्याची बाब भिंगार पोलिसांना दिसत नसल्याचा आरोप अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी हातभट्टी दारूवर कारवाई करत एक लाख 60 हजार रुपये किमतीची सुमारे दीड हजार लीटर दारू जप्त केली.

पोलीस अंमलदार भानुदास खेडकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हातभट्टी विक्रेता जय ऊर्फ भाऊ भिंगारदिवे याच्याविरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिंगार शहरामध्ये खुलेआम अवैध धंदे जोरात सुरू आहेत. याकडे भिंगार पोलिसांचे साफ दुर्लक्ष झाले आहे. भिंगारमध्ये मावा निर्मिती मोठ्या प्रमाणात होती. तो मावा जिल्ह्यात पाठविला जातो. हातभट्टी दारू तयार करून त्याची विक्री केली जात आहे. या हातभट्टीवर आता अल्पवयीन मुले दारू पिण्यासाठी जात आहेत. विक्रेत्यांकडूनही त्यांना हातभट्टी दिली जात आहे. मंगळवारी एक 14 वर्षीय मुलगा भिंगारदिवे याच्या हातभट्टीवर दारू पिण्यासाठी गेला होता. त्यानेही त्या अल्पवयीन मुलाला दारू दिली. दारू पिल्यामुळे तो मुलगा बेशुद्ध पडला. त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

दरम्यान या घटनेनंतर अवैध धंद्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करणार्‍या भिंगार पोलिसांनी मंगळवारी रात्री भाऊ भिंगारदिवे याच्या हातभट्टीवर छापा टाकला. यामध्ये तब्बल एक लाख 60 हजार रुपये किमतीची दारू जप्त केली. अल्पवयीन मुलाच्या नातेवाईकांनी भिंगार पोलिसांवर आरोप केले आहेत. भिंगारमध्ये खुलेआम दारू विक्री होत असतानाही पोलिसांकडून कारवाई केली जात नाही. याबाबत पोलिसांना कल्पना देऊनही ते दारू विक्रेत्यांना पाठिशी घालत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

तर पांगरमलची पुनरावृत्ती

हातभट्टी तयार करण्यासाठी शरिराला घातक असलेल्या रसायनाचा वापर केला जातो. नगर तालुक्यातील पांगरमल येथे काही दिवसांपूर्वी विषारी दारूचे सेवन केल्यामुळे अनेकांचा बळी गेला होता. भिंगारमध्ये खुलेआम हातभट्टी दारूची निर्मितीकरून विक्री केली जात आहे. या हातभट्टी निर्मितीसाठी घातक रसायनाचा वापर केला जातो. याकडे पोलिसांकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. अजूनही भिंगारमध्ये अनेक ठिकाणी हातभट्टी अड्डे सुरू असून त्यावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com