भिंगारमधील तीन बिंगो जुगारावर छापे

सात जणांविरूध्द गुन्हा || दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
File Photo
File Photo

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

भिंगार कॅम्प पोलिसांनी शनिवारी भिंगार शहर व परिसरात तीन ठिकाणी सुरू असलेल्या बिंगो जुगारावर छापे टाकून कारवाई केली. याप्रकरणी तीन स्वतंत्र फिर्यादी दाखल करण्यात आल्या असून सात जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गवळीवाडा येथे पाण्याच्या टाकीजवळ बिंगो जुगार खेळविणार्‍या आकाश चंद्रकांत घोरपडे (वय 28 रा. सदर बाजार भिंगार) याच्यावर दुपारी दीड वाजता कारवाई करण्यात आली. कारवाईत पोलिसांनी एलईडी, रोख रक्कम असा 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अंमलदार भानुदास खेडकर यांच्या फिर्यादीवरून त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच ठिकाणी रवी शंकर परदेशी (वय 41 गवळीवाडा, भिंगार) याच्यावरही सायंकाळी साडेपाच वाजता कारवाई करण्यात आली. एलईडी, रोख रक्कम व लॅपटॉप असा 41 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अंमलदार राहुल गोरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगर-पाथर्डी रोडवरील दक्षिणमुखी हनुमान मंदिराजवळ पत्र्याचे शेडमध्ये सुरू असलेल्या बिंगो जुगारावर दुपारी साडेतीन वाजता कारवाई करण्यात आली. रोख रक्कम, मोबाईल, एलईडी स्क्रीन असा 83 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अंमलदार खेडकर यांच्या फिर्यादीवरून विशाल अनिल डुकरे (वय 21 रा. वडारवाडी, भिंगार), श्रेयस सुनील इवळे (वय 24 रा. इवळे मळा, सारसनगर), संकेत राजेश दळवी (वय 22, रा. बुर्‍हाणनगर ता. नगर), श्रीकांत बाळासाहेब शेलार (वय 24 रा. नागरदेवळे ता. नगर), रवींद्र मच्छिंद्र आळकुटे (वय 30 रा. वडारवाडी, भिंगार) यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर शहर प्रभारी उपअधीक्षक अजित पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या कारवाया केल्या आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com