
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
घातक शस्त्रासह संघटीतपणे गुन्हे करून सर्वसामान्य नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करणारी भिंगार येथील टोळी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी नगर जिल्ह्यातून दीड वर्षाकरिता हद्दपार केली आहे. यामध्ये तिघांचा समोवश आहे. त्यांच्याविरूध्द भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
टोळी प्रमुख स्वप्निल सुनील वाकचौरे (वय 23), टोळी सदस्य प्रताप सुनील भिंगारदिवे (वय 24 दोघे रा. प्रबुध्दनगर, नागरदेवळे, भिंगार) व निलेश दत्तात्रय लाहुंडे (वय 29 रा. संभाजीनगर, नगर- पाथर्डी रोड, भिंगार) अशी हद्दपार केलेल्यांची नावे आहेत. भिंगारमधील सर्वसामान्य नागरिकांवर दहशत निर्माण करून गैरकायद्याची मंडळी जमवून हातात चाकू, लाकडी दांडके घेऊन जिवे मारण्याचा प्रयत्न करणे, विनयभंग करणे, अपहरण करणे तसेच लाकडी दांडके, चाकू असे घातक हत्यार जवळ बाळगून गंभीर दुखापत करून दशहत निर्माण करणार्या टोळीस महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 चे कलम 55 अन्वये हद्दपार करण्याचा प्रस्ताव भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी डिसेंबर 2022 मध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे सादर केला होता.
प्रस्ताव सादर करण्यापूर्वी देखील टोळी प्रमुख व त्याच्या साथीदारांवर वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई केली होती. दरम्यान, त्यांच्या वर्तनात काहीएक सुधारणा होत नसल्याने त्यांच्या विरूध्द गुन्ह्यांची व्याप्ती पहाता टोळी प्रमुख व टोळी सदस्यांची सविस्तर सर्वंकष चौकशी करून प्राप्त पुराव्यांच्या आधारे यातील टोळी पासून भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत तसेच नगर जिल्हा परिसरातील सर्व सामान्य नागरिकांच्या जिवीताचे व मालमत्तेच्या सुरक्षीततेसाठी व टोळीची सर्वसामान्य नागरिकांमध्ये असलेली दहशत कमी करण्यासाठी तसेच टोळीच्या गैर कृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी टोळी प्रमुख व टोळी सदस्य यांना नगर जिल्ह्यातून 18 महिन्यांकरिता हद्दपार केले आहे.