भेंड्याच्या तरूणाला नोकरीचे आमिष दाखविणारा भामटा राहुरीत जेरबंद

संगमनेरच्या तरूणावर गुन्हा || अन्य साथीदार पळाले, शोध सुरू
जेरबंद
जेरबंद

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

मंत्रालयात नोकरीला लावून देतो, असे आमिष दाखवून एका तरूणाची पाच लाख रूपयांची फसवणूक करताना राहुरी पोलिस पथकाने दिनांक 8 सप्टेंबर रोजी राहुरी विद्यापीठ परिसरात सापळा लावून एकाला ताब्यात घेतले. मात्र त्याचे साथीदार पळून गेले. पोलिस पथक त्यांचा शोध घेत आहेत.

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथील महेश बाळकृष्ण वाघडकर, वय 25 वर्षे. या तरूणा बरोबर संबंधित फसवणूक करणार्‍या इसमाने दहा दिवसांपूर्वी ओळख करून घेतली होती. त्यावेळी त्याने मुंबई येथे मंत्रालयात सामाजिक न्याय विभागात कक्ष अधिकारी म्हणून नोकरीस आहे, असे सांगीतले होते. तसेच वारंवार बोल बचन करून त्या भामट्याने महेश वाघडकर याचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्याला सांगीतले, आमच्याकडे रिक्त पदासाठी जागा सोडतात. त्या रिक्त पदावर मी तुझे काम करतो. पाच लाख रूपये भरावे लागतील. असे त्याला नोकरीचे आमिष दाखवले. ऑर्डर आल्यावर दोन लाख रूपये व नोकरीवर हजर झाल्यावर तीन लाख रूपये द्यावे लागतील. असा व्यवहार ठरला.

दिनांक 8 सप्टेंबर रोजी त्या भामट्याने सकाळीच महेशला फोन करुन सांगितले. अभिनंदन तू सरकारी अधिकारी झालास तूझी ऑर्डर आली. आई वडिलांचे आर्शिवाद घे. आणि पैसे घेऊन राहुरी विद्यापीठात ये. महेश वाघडकर या तरूणाला संशय आल्याने तो दोन लाख रूपये घेऊन राहुरी पोलिस ठाण्यात आला. आणि पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांना सविस्तर माहिती दिली. दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सज्जन नार्‍हेडा, पोलिस शिपाई गणेश लिपणे व इतर पोलिस कर्मचार्‍यांच्या पथकाने विद्यापीठ येथील गेस्ट हाऊस परिसरात सापळा लावून दत्तात्रय अरूण शिरसागर या भामट्याच्या मुसक्या आवळून ताब्यात घेतले. मात्र त्याचे साथीदार आकाश विष्णू शिंदे व इतर पसार झाले.

महेश बाळकृष्ण वाघडकर याच्या फिर्यादीवरून आरोपी दत्तात्रय अरूण शिरसागर, वय 31 वर्षे, राहणार दत्तनगर, मालेगाव बस स्थानक. व आकाश विष्णू शिंदे, राहणार संगमनेर तसेच त्यांचे इतर साथीदारांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सज्जन नार्‍हेडा हे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com