भेंडा येथील कारखाना आवारातून ट्रॅक्टर चोरून नेला

पाथर्डी तालुक्यातील ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल
भेंडा येथील कारखाना आवारातून ट्रॅक्टर चोरून नेला

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या आवारात ऊसाने भरलेल्या ट्रॉलीसह उभा ट्रॅक्टर जुन्या (काम सोडून गेलेल्या) ट्रॅक्टर चालकाने चोरुन नेल्याची घटना 17 मार्च रोजी घडली. याबाबत ट्रॅक्टरमालकाच्या फिर्यादीवरून एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सोमनाथ दशरथ नरोटे )वय 28) धंदा-शेती रा. मोहरी ता. पाथर्डी यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, आम्ही शेती कामासाठी 2012 मध्ये महेंद्रा 595 टर्बो (एमएच 26 ई 3515) हा ट्रॅक्टर विकत घतला. सदरचा ट्रॅक्टर गणेश भीमराज होन, रा. कडीत, ता. श्रीरामपूर यांचेकडून वडिलांच्या नावे नोटरी करून विकत घेतला होता. सदर ट्रॅक्टर भेंडा येथील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याला ऊस वाहतुकीसाठी लावलेला आहे. माझ्या ट्रॅक्टरवर माझ्या गावातील मोहरी ता. पाथर्डी ही सासुरवाडी असलेला रामदास ठाकूर हा ड्रायव्हर (चालक) म्हणून काम करीत होता. परंतु 12 मार्च 2022 रोजी तो अचानकपणे कामावरून निघून गेला व त्यानंतर परत कामावर आला नाही त्यामुळे मीच ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम करतो.

17 मार्च 2022 रोजी रात्री 11 वाजता ट्रॅक्टरचा नंबर येण्यास सकाळ होणार असल्याने मी कारखान्याच्या यार्डात जुगाडासह उसाने भरलेला ट्रॅक्टर उभा करून माळीचिंचोरा शिवारातील आमच्या अड्ड्यावर मुक्कामासाठी गेलो होतो. दुसर्‍या दिवशी सकाळी 8 वाजता मी कारखाना यार्डात आलो असता ट्रॅक्टर लावलेल्या जागी दिसला नाही. तिथे फक्त जुगाड होते. मी बाकीच्या ट्रॅक्टरच्या ड्रायव्हरकडे चौकशी केली असता माझ्या ट्रॅक्टरवर ड्रायव्हर म्हणून काम करणारा रामदास ठाकूर याने ट्रॅक्टर नेल्याबाबत सांगितले. रामदास ठाकूर याचे दोन्ही मोबाईल नंबर बंद मिळून आले. माझ्या संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी रामदास ठाकूर (रा. मोहरी ता. पाथर्डी) याने ट्रॅक्टर चोरून नेला. या फिर्यादीवरून नेवासा पोलिसांनी गुन्हा रजिस्टर 258/2022 भारतीय दंड विधान कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस नाईक बी. आर. कोळपे करत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com