भेंडा गोळीबार प्रकरणाला सूडनाट्याचे वळण...

गावठी कट्टयासह १० आरोपींना अटक
भेंडा गोळीबार प्रकरणाला सूडनाट्याचे वळण...

नेवासा l तालुका प्रतिनिधी l Newasa

तालुक्यातील भेंडा येथे 2 मे रोजी रात्री झालेल्या गोळीबार प्रकरणाला आता सूडनाट्याचे वळण आले असून मुलीच्या कारणावरून व घटनेतील जुन्या वादातील लोकांना अद्दल घडविण्याच्या उद्देशाने जखमी सोमनाथ तांबे यांच्या मित्रांनीच गोळीबार नाट्य घडवून आणल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी नेवासा पोलिसांनी शुभम विश्वनाथ गर्जे, स्वप्नील बाबासाहेब बोधक, अमोल राजेंद्र शेजवळ, अमोल अशोक गडाख, अक्षय रामदास चेमटे यांचे एकूण 10 आरोपींना अटक केली असून एक गावठी कट्टा हस्तगत केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विजय करे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

रविवारी भेंडा येथील युवक सोमनाथ तांबे हा गोळीबारात जखमी झाला होता. त्याने पोलिसांना दिलेल्या जबाब व फिर्यादीत पप्पू जावळे व गणेश पुंड यांचे सारखीच शरीरयष्टी असलेल्या इसमाने पिस्तुल सारख्या शस्राने फायर केल्याचे व मी जखमी झाल्याचे सांगून या दोन संशयित इसमाविरुद्ध फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी या दोन संशयितांवर गुन्हा नोंदवून त्यांना ताब्यातही घेतले होते.

मात्र घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक डॉ.दीपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय करे, सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय ठाकूर, उपनिरीक्षक भरत दाते यांचे पथकाने व्हॉलीबॉल खेळणार्‍या 11 मुलांची पार्श्वभूमी तपासून पाहिली असता त्यातील सोमनाथचे जवळचेच मित्र शुभम गर्जे व स्वप्नील बोधक यांचेवर पोलीस रेकॉर्डमध्ये गुन्हे दाखल असल्याचे व ज्यांच्यावर संशय घेतला गेला त्यांचे आणि या दोघांचे पूर्वीचे वाद व वैमनस्य असल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून पोलिसांनी पुढे तपास केला असता मुलीचे कारणावरून व जुन्या वादातील लोकांना अद्दल घडविण्याच्या उद्देशाने जखमी सोमनाथ तांबे यांच्या मित्रांनी गोळीबार नाट्य घडवून आणल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.

याबाबत पोलीस निरीक्षक विजय करे म्हणाले की, गोळीबार घटनेची 24 तासात उकल केली असून 10 सराईत आरोपींना शिताफीने अटक केली आहे. फिर्यादी व फिर्यादीचे मित्र यांनी खोटा बनाव करुन द्वेषबुद्धीने पप्पू जावळे व पुंड यांची नावे सांगून फिर्याद दिल्याचा पोलिसांना संशय आल्याने दोन पथकांनी वेगवेगळे पध्दतीने तपास सुरु केला. 24 तासात 50 पेक्षा जास्त साक्षीदारांकडे चौकशी केली. पोलिसांना झालेल्या घटनेबाबत संशय येत होता. अखेर सुक्ष्म तपास करुन गोळीबार करणारे आरोपी यांच्या मुसक्या आवळल्या.

यातील सत्यघटना अशी की, यातील फिर्यादी सोमनाथ तांबे हा त्याचा मित्र स्वप्नील बोधक याचेकडे व्हॉलीबॉल खेळण्यासाठी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास आला होता. त्याचवेळी त्यांचा मित्र शुभम विश्वनाथ गर्जे रा.वडुले हा देखील त्या ठिकाणी आला. शुभम विश्वनाथ गर्जे याचे मित्र अमोल राजेंद्र शेजवळ (वय 22) रा. अंबिकानगर (सोनई), अमोल अशोक गडाख (वय 22) रा. गडाखवस्ती (सोनई), अक्षय रामदास चेमटे रा.घोडेगाव यांनी शिंगणापूर पोलीस ठाण्याचे हद्दीत एका व्यक्तीला कुर्‍हाडीने मारुन गंभीर जखमी करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर शुभम गर्जे याचे बोलाविल्यावरुन व त्यांना घेण्यासाठी वडाळा पाटी येथे जाऊन त्या तिघांना भेंडा येथे व्हॉलिबॉल खेळत असलेल्या मैदानावर घेवुन आला.

शुभम विश्वनाथ गर्जे, स्वप्नील बाबासाहेब बोधक, अमोल अशोक गडाख, अक्षय रामदास चेमटे, अमोल राजेंद्र शेजवळ, सोमनाथ तांब हे लांडेवाडी (भेंडा) येथील मैदानावर सायंकाळी हजर असताना त्यातील अक्षय चेमटे याने मुलीचे कारणावरून त्याने हातातील गावठी पिस्तुलातून सोमनाथ तांबे याच्या छातीवर गोळी मारली. त्यात सोमनाथ तांबे जखमी होवून खाली कोसळला. त्यावेळी वरील सर्वांनी कट करुन यातील अमोल अशोक गडाख, अक्षय चेमटे, अमोल शेजवळ यांना गावठी कट्ट्यासह पळवून लावले.सोमनाथ तांबे यास पप्पू जावळे व गणेश पुंड यांनी गोळीबार केला असे खोटे नाव सांगून पोलिसांची दिशाभूल केली.

परंतु तपासाअंती सदरचा गोळीबार अमोल अशोक गडाख, अक्षय रामदास चेमटे, अमोल राजेंद्र शेजवळ यांनी केला व यातील आरोपी शुभम विश्वनाथ गर्जे व स्वप्नील बाबासाहेब बोधक यांनी खोटा बनाव करुन दिशाभूल केली व आरोपी पळवून लावले.

आरोपी ओंकार राजेंद्र काकडे, प्रसाद शिवाजी दळवी, अक्षय संजय हाफशेटे सर्व रा. शहरटाकळी, ता.शेवगाव यांनी आरोपी हे गुन्हेगार आहे व गंभीर गुन्हा करुन आले आहेत याची माहिती असतानाही त्यांना मदत केली, आश्रय दिला व राहण्याची व्यवस्था केली. तसेच आरोपी शुभम किशोर जोशी रा. शहरटाकळी याने आरोपीकडील गावठी कट्ट्याचे जिवंत काडतुस स्वत:जवळ ठेवून घेतली. आरोपी सचिन साहेबराव काते, रा. सामनगाव, ता. शेवगाव याने आरोपींना लपवून ठेवण्यासाठी व आरोपींना मदत व्हावी म्हणून आरोपींना लॉजिंग करून दिली व त्यांची राहण्याची व्यवस्था केली.

वरील सर्व आरोपींना नेवासा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय करे गांचे मार्गदर्शनाखालील तपास पथकाचे उपनिरीक्षक भरत दाते, पोलीस नाईक राहुल यादव, महेश कचे, सुहास गायकवाड, कॉन्स्टेबल वसीम इनामदार, श्री. गुंजाळ, गणेश इथापे यांनी व तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय ठाकूर अशा दोन पथकांनी वेगवेगळा ठिकाणाहून अटक केली असून त्यांचेकडून गुन्ह्यात वापरलेली पल्सर मोटारसायकल, गावठीकट्टा (पिस्तूल) व जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

तिघा आरोपींनी शनिशिंगणापूर पोलीस ठाणे हद्दीत एकास गंभीर जखमी करुन जिवे ठार मारण्याच प्रयत्न केलेबाबत कबुली दिली आहे. तसेच वरील आरोपीवर वेगवेगळे ठिकाणी गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहे. वरील आरोपीकडे प्राणघातक शस्र होते व ते अहमदनगर जिल्हातून बीड जिल्ह्यात आश्रयाला जाणार होते अशी माहिती आरोपींनी दिली आहे. आरोपींकडे गावठी कट्टा असतानाही पोलिसांनी रात्रीचे वेळी त्यांना शेवगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून शिताफीने अटक केली.

याप्रकरणी नेवासा पोलिसांनी शुभम विश्वनाथ गर्जे, स्वप्नील बाबासाहेब बोधक, अमोल राजेंद्र शेजवळ, अमोल अशोक गडाख, अक्षय रामदास चेमटे यांचे विरुद्ध गुन्हा रजी. नंबर 21 भारतीय दंड विधान कलम 307 सह शस्रअधिनियम 1949 चे कलम 3/25 प्रमाणे तर आरोपी ओंकार राजेंद्र काकडे, प्रसाद शिवाजी दळवी, अक्षय संजय हाफशेटे, शुभम किशोर जोशी, सचिन साहेबराव काते यांचेविरूद्ध आरोपींना मदत करणेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सर्व दहा आरोपींना काल बुधवारी न्यायालयापुढे हजर केले असता त्यांना 10 मे पर्यंत 5 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.

डबल गेमचा प्रयत्न फसला

आपलाच मित्र सोमनाथ तांबे याला गोळी घालून अमोल गडाख, अक्षय चेमटे, अमोल शेजवळ यांनी मुलीचे करणावरूनच्या भांडणाचा सूड तर शुभम गर्जे,स्वप्नील बोधक यांनी सोमनाथचे तोंडी पप्पू जावळे व गणेश पुंड यांचे नावे घालून मित्रालाच मारून आपापले सूड उगविण्यासाठी केलेला डबल गेमचा बेत पोलिसांच्या सावधानतेने फसला. सोमनाथ तांबे व पप्पू जावळे, गणेश पुंड हे एकमेकांचे नातेवाईकही लागतात,पाहुण्यांच्या हातून साप मारून घेऊन आपला सूड उगविण्याच्या प्रयत्न शुभम गर्जे व स्वप्नील बोधक यांनी केला. मेला तर सोमनाथ मरेल आणि त्यांचे पाहुणे फासावर जातील अशी पक्की व्यवस्था या दोघांनी केली होती.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com