
भेंडा |वार्ताहर| Bhenda
नेवासा तालुक्यातील भेंडा येथे नेवासा-शेवगाव रोडवर असलेल्या स्वप्नील फुटवेअरला विजेचे शॉर्टसर्किटमुळे आग लागून सुमारे दोन लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. सदर घटना बुधवार 10 मे रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की भेंडा येथे नेवासा-शेवगाव रोडवर स्वप्निल रमेश शेंडे यांचे स्वप्निल फुटवेअर हे चप्पलाचे दुकान आहे. बुधवार 10 मे रोजी स्वप्निल फुटवेअरला विजेच्या शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागली.विजेच्या शॉर्टसर्किटमुळे दुकानात आवाज येऊ लागल्याने शेजारील दुकानदारांचे लक्ष दुकानाकडे वेधले गेले.इतर दुकानदारांनी धाव घेऊन आपापल्या दुकानातील पाण्याच्या जारमधील पाणी मारून आग विझवली.
या आगीमुळे दुकानातील चप्पल, बूट व इतर साहित्य जळाले तसेच शोरूमच्या काचेचेही नुकसान झाले आहे. या आगीमुळे स्वप्निल फुटवेअरचे सुमारे दोन लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. याबाबत स्वप्निल शेंडे यांनी नेवासा पोलीस स्टेशनला ठाण्यात खबर दिली आहे.