भेंडा येथील शासकीय कोविड सेंटरला मदतीचा ओघ सुरु

कॉन्ट्रॅक्टर युनियनची सव्वादोन लाखांची देणगी तर पाठक यांच्याकडून 50 हजाराचा किराणा
भेंडा येथील शासकीय कोविड सेंटरला मदतीचा ओघ सुरु

भेंडा |वार्ताहर| Bhenda

येथील शासकीय कोविड केअर सेंटरच्या औषधांसाठी ऑक्सिजन पुरवठा प्रणालीकरिता नेवासा तालुका कॉन्ट्रॅक्टर युनियनच्यावतीने 2 लाख 25 हजार 555 रुपयांची देणगी तर सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव पाठक यांचे कडून 50 हजार रुपये किंमतीचा किराणामाल अशी एकूण 2 लाख 75 हजार 555 रुपयांची मदत तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांचे कडे सुपूर्द करण्यात आली आहे.

भेंडा येथील श्रीसंत नागेबाबा भक्त निवास मध्ये सुरू असलेल्या शासकीय कोविड सेंटर मध्ये सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांना औषधे व ऑक्सिजन मिळावा, त्यांच्या जेवणाची उत्तम सोय व्हावी यासाठी प्रशासकीय यंत्रणा, नागेबाबा परिवार व सामाजिक संघटना अहोरात्र प्रयत्न करीत आहेत. तहसीलदार रुपेश सुराणा व आरोग्य अधिकारी डॉ. अभिराज सूर्यवंशी यांनी या कोविड केअर सेंटर मधील सोई-सुविधेसाठी दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी पुढे यावे असे दै. सार्वमतच्या माध्यमातून केलेल्या आवाहनाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

नेवासा पंचायत समिती अंतर्गत ठेकेदारीचे काम करणार्‍या नेवासा तालुका कॉन्ट्रॅक्टर युनियनने सर्व ठेकेदारांच्या वर्गणीतून जमा झालेले 2 लाख 25 हजार 555 रुपयांचा धनादेश तहसीलदार सुराणा यांचेकडे सुपूर्द केला. या पैशातून भेंडा कोविड सेंटरसाठी आवश्यक असणारी औषधे व ऑक्सिजन यंत्रणा खरेदी केली जाणार असल्याची माहिती तहसीलदार सुराणा यांनी दिली.

यावेळी नेवासा पंचायत समितीचे सभापती रावसाहेब कांगुणे, उपसभापती किशोर जोजार, गटविकास अधिकारी शेखर शेलार, बामधकाम उपअभियंता संजय घुले, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिराज सूर्यवंशी, वैद्यकीय अधिकारी डॉ. साळुंके, डॉ. भाग्यश्री सारूक-कीर्तने, बाजार समितीचे सभापती डॉ. शिवाजी शिंदे, पैस उद्योग समूहाचे प्रमुख शिवाजीराव पाठक, तलाठी विजय जाधव, राजेंद्र चिंधे, नंदकुमार गव्हाणे, ठेकेदार बापूसाहेब नवले, बाबासाहेब घुले, महेश डोईफोडे, अमोल पवार, कासम शेख, बाळासाहेब मते,रवि सोनवणे, सचिन नागोडे, अशोकराव रवंदाळे, भाऊसाहेब नागोडे आदी उपस्थित होते.

नागेबाबा परिवाराचे आवाहनाला प्रतिसाद...

भेंडा कोविड केअर सेंटर मधील रुग्णांच्या उत्तम भोजन व्यवस्थेकरीता दानशूरांनी रोख रक्कम, धान्य, किराणा, साखर, भाजीपाला स्वरूपात मदत करण्याचे आवाहन नागेबाबा परिवाराचे अध्यक्ष कडूभाऊ काळे यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक दानशूर व्यक्ती मदतीसाठी पुढे येत असून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. त्याचाच एक भाग म्हणून सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव पाठक यांनी 50 हजार रुपयांच्या किरणामालाची मदत केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com