भावली ओव्हरफ्लो गोदावरीत विसर्ग वाढला

भावली ओव्हरफ्लो गोदावरीत विसर्ग वाढला

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

दारणा धरणाच्या (Darna Dam) शेजारी असलेले भावली धरण (Bhavali Dam) काल सकाळी 6 वाजता 100 टक्के भरले! या धरणाच्या सांडव्यावरून 73 क्युसेकने विसर्ग सुरू होता. हे पाणी दारणात दाखल होत आहे.

दारणाच्या (Darna) जलाशयात जवळपास 80 टक्कयांपर्यंत वाढ होत आहे. ब्रिटिशकालीन या धरणाच्या (British period Dam) सहा वक्राकार स्वयंचालित दरवाजातून सकाळी 11 वाजता यंदाचा पहिला मोठा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यातून 1हजार 241 तर जलविद्युत प्रकल्पग्रहातून 550 असा एकूण 1 हजार 791 क्युसेकने विसर्ग सुरू झाला आहे. सायंकाळी 6 वाजता तो वाढवून 1982 इतका करण्यात आला. नांदूरमधमेश्वर बंधार्‍यातून (Nandurmadhameshwar dam) सकाळी गोदावरी नदीत 301 क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते. त्यानंतर सायंकाळी 807 क्युसेकपर्यंत वाढविण्यात आले. रात्रीतून आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. गंगापूर धरणात 63.62 दलघफू पाणीसाठा आहे.

भावली धरण (Bhavali Dam) मागील वर्षाच्या तुलनेत यंदा लवकर भरले आहे. इगतपुरी (Igatpuri) तालुक्यातील घाटमाथ्यावर पावसाने मागील आठवड्यात जोरदार हजेरी लावल्याने या धरणात घाटमाथ्यावरील धबधबे सुरु आहेत. त्यामुळे या धरणात पाण्याची आवक होत आहे. हे धरण काल रात्रीतून भरले. या धरणाला सांडवा आहे. धरण पूर्ण क्षमतेचे भरल्यानंतर पाणी सांडव्यावरुन पडण्यास सुरुवात होते. 1434 दलघफू क्षमतेचे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. भावली धरणाच्या पाणलोटात 1 जून पासून 1972 मिमी इतका पाऊस झाला. काल सकाळी या धरणाच्या पाणलोटात 51 मिमी पावसाची नोंद झाली. या धरणात काल सकाळी 6 वाजे पासुन 73 क्युसेकने विसर्ग सुरु झाला आहे. हा विसर्ग दारणात दाखल होतो.

दारणा धरणातून (Darna Dam) विद्युत प्रकल्पाच्या गेट मधून 670 क्युसेकने विसर्ग सोडला जात आहे. नवीन येणारे पाणी न साठता नांदूरमधमेश्वर च्या दिशेने वाहुन जाते. काल सकाळी 6 वाजता दारणाच्या पाणलोटातील इगतपुरीला 30 मिमी, घोटीला 38 मिमी, तर दारणाच्या भिंतीजवळ 9 मिमी अशी नोंद झाली. मागील 24 तासात दारणात 59 दलघफू नविन पाणी दाखल झाले.

गंगापूरच्या पाणलोटातही (Watershed of Gangapur) पावसाचे कधी दमदार तर कधी मध्यम आगमन सुरुच आहे. काल सकाळी 6 वाजता या धरणाच्या पाणलोटातील त्रंबक येथे 72 मिमी पावसाची नोंद झाली. अंबोली येथे 58 मिमी तर गंगापूरच्या भिंतीजवळ 35 मिमी पावसाची नोंद झाली. 24 तासांत गंगापूर मध्ये 144 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. यामुळे या धरणाचा साठा 61.13 टक्के इतका झाला आहे. 5630 क्षमतेच्या या धरणात 3442 दलघफू पाणीसाठा आहे.

दारणाचा विसर्ग नांदुरमधमेश्वर मध्ये दाखल होत आहे. तेथून गोदावरीत 502 क्युसेकने विसर्ग सुरु आहे. त्याच बरोबर गोदावरीच्या उजव्या तसेच डाव्या कालव्याचे पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सुरु आहे.

अन्य धरणाच्या पाणलोटातील पाऊस असा- वाकी 28 मिमी, भाम 26 मिमी,वालदेवी 2 मिमी, कश्यपी 19 मिमी, गौतमी गोदावरी 42 मिमी, कडवा 12 मिमी.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com